गोव्यातील रस्त्यांवर आजपासून धावणार हरित इंधनावरील बसेस

0
871

बायोगॅसचा इंधन म्हणून वापर करुन त्यावर चालणा-या बसगाड्या आज पासून गोव्यातील रस्त्यांवर धावू लागल्या आहेत. देशातील पहिला प्रयोग गोव्यात सुरु झाला आहे. कदंब महामंडळाने स्वीडनच्या स्कॅनिया या कंपनीशी हातमिळवणी केली असून बायोगॅसवर चालणारी एक आणि बायो इथॅनॉलवर चालणा-या दोन बसगाड्यांचा शुभारंभ आज राज्यपाल श् मृदुला सिन्हा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून करण्यात आले.
या बसगाड्यांचा प्रयोग यशस्वी झाल्यास प्रदूषण निर्मूलनाच्यादृष्टिने तो मैलाचा दगड ठरणार आहे.
याच कंपनीच्या बायो इथॅनॉलवर चालणा-या बसेस सध्या नागपूर महापालिकेच्या ताफ्यात आहेत.
पूर्णपणे वातानुकुलीत असलेली ही बस ३७ आसनी असून इंजिन मागील बाजूस आहे. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आणि जीपीएस सिस्टम असल्याने बस नेमकी कुठे आहे हे ट्रॅक केले जाऊ शकते. या बसचे खास वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांगांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये चढण्या-उतरण्यासाठी सोयीचे व्हावे याकरिता अशी व्यवस्था आहे की बसचे फ्लोरिंग खाली घेता येते. गतिरोधक आला किंवा रस्त्यावर पावसाचे पाणी साचलेले असल्यास फ्लोरिंग एक फूट वर घेता येते.
साधारणपणे एक टन कच-यापासून २५ क्युबिक मिटर बायोगॅस तयार होतो. प्रती क्युबिक मिटर साधारणपणे अडीच किलोमिटर बस धावू शकते. याचाच अर्थ २५ क्युबिक मिटर गॅस इंधन म्हणून वापरला तर त्यातून ६0 ते ६२ किलोमिटर मायलेज मिळू शकते. कदंब महामंडळाचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास ती एकप्रकारची हरित क्रांती ठरणार आहे.