गोव्यातील मासे खाण्यास सुरक्षित;एफडीएचे घुमजाव

0
1193
गोवा खबर: मासे साठवून ठेवण्यासाठी वापरल्या जात असलेल्या प्रतिबंधीत फोर्मेलीन या रसायनाचे प्रमाण परवानगी असलेल्या मर्यादेत असल्याने गोव्यातील मासे खाण्यास सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण अन्न आणि औषध प्रशासनाने केले आहे.सकाळी याच प्रशासनाने मडगाव येथील घाऊक मासळी बाजारात मासे घेऊन आलेल्या ट्रकांवर धाड टाकुन स्पॉट टेस्टिंग केले त्यात फोर्मेलीन असल्याचे सांगण्यात आले होते.त्यानंतर कृषीमंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे मच्छी विक्रेत्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले आणि सकाळची पॉझिटीव्ह टेस्ट सायंकाळी निगेटिव्ह झाली.
आज भल्या पहाटे एफडीएने मडगाव येथील घाऊक मासळी बाजारात बाहेरील राज्यातून मासळी घेऊन आलेल्या 17 ट्रकांमधील मासळीची धाड टाकून  तपासणी केली आणि राज्यात मासळी संकट सुरु झाले.एफडीएच्या करवाईचा निषेध म्हणून मडगाव,पणजी आणि म्हापसा शहरातील मासळीचे घाऊक आणि किरकोळ बाजार बंद करण्यात आल्याने गोव्यात मासळी संकट निर्माण झाले.
गोव्यात सध्या मासेमारी बंद असल्याने बहुतेक सगळी मासळी शेजारील महाराष्ट्र,आंध्रप्रदेश,केरळ आणि कर्नाटक मधून आयात केली  जाते.परराज्यातुन आयात केलेली मासळी साठवून ठेवण्यासाठी आरोग्यास हानिकारक असे रसायन वापरले जात असल्याची माहिती मिळाल्या नंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने आज पहाटे मडगाव येथील घाऊक मासळी बाजारात परराज्यातुन मासळी घेऊन आलेल्या 17 ट्रकांमधील मासळीची तपासणी केली. त्यात आरोग्यास हानिकारक रसायन वापरले असल्याचे आढळून आले. मासळी साठवून ठेवण्यासाठी Formalin नावाचे रसायन वापरले जात असल्याच्या बातम्या आणि स्थानिकांच्या तक्रारी आल्या नंतर आज पहाटे ही  कारवाई करण्यात आली होती.या कारवाईचा निषेध म्हणून मडगाव,पणजी आणि म्हापसा येथील मासळीचे घाउक आणि किरकोळ बाजार बंद ठेवल्यामुळे नुस्तेप्रेमी गोवेकरांचे हाल झाले आहे.31 जुलै पर्यंत गोव्यात मासे मारी बंदी असल्याने गोवेकरांना मासळी साठी शेजारील राज्यांवर अवलंबून रहावे लागते.
एफडीएच्या कारवाईने संतप्त झालेल्या मासे विक्रेत्यांनी आपली कैफियत कृषीमंत्री सरदेसाई यांच्या समोर मांडली. त्यानंतर सरदेसाई यांनी चक्रे फिरवत मुख्यमंत्री आणि संबंधितांशी चर्चा केली. सायंकाळ पर्यंत मासे खायचे की नाही या संभ्रमात असलेल्या गोवेकरांना एफडीएच्या खुलाशाने दिलासा मिळाला आहे.मात्र सकाळी पॉझीटीव्ह आलेला रिपोर्ट संध्याकाळी निगेटीव्ह कसा आला याचे कोडे गोवेकरांना अजुन उलगडलेले नाही.