गोव्यातील कोरोनाच्या संशयितावर गोमेकॉत उपचार सुरु

0
640
 गोवा खबर:चीन मधून आलेल्या एका प्रवाशामध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे आढळून आल्याने त्याच्यावर बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज मध्ये उपचार सुरु आहेत.संशयित प्रवाशाच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.गोवा सरकार कोरोनाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून लोकांनी घाबरून जाऊ नये,असे आवाहन कोरोनाचा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाने केले आहे.
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारने सर्व संबंधीत घटकांचा समावेश असलेल्या प्रतिनिधींच्या कृती दलाची स्थापना केली आहे.बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज मध्ये 30 खाटांचा विशेष कक्ष बनवण्यात आला असून त्यात 2 आईसीयूचा देखील समावेश आहे.त्याशिवाय दाबोळी विमानतळ आणि मुरगाव पोर्ट पासून जवळ असलेल्या चिखली येथील आरोग्य केंद्रात देखील उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
आज पणजी येथील आरोग्य संचालनालयाच्या कार्यालयात कोरोना कृतीदलाची बैठक पार पडली.बैठकी नंतर आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती देण्यात आली.
गोवा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर म्हणाले,चीन मधून आलेल्या प्रवाशात कोरोनासदृश काही लक्षणे आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यावर गोमेकॉत बनवलेल्या खास कक्षात उपचार सुरु आहेत.लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे.मास्क व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे.लोकांनी घाबरून जाण्याचे कोणतेच कारण नाही.

गोवा हे पर्यटन राज्य असल्याने देश विदेशामधील पर्यटक गोव्यात येत असतात.त्यामुळे गोवा विमानतळावर थर्मल स्कॅनर बसवला जावा, अशी मागणी गोवा सरकारने केंद्राकडे केली आहे.मात्र गोवा थेटपणे संपर्कात नसल्याने सध्या तरी त्याची आवश्यकता नसल्याचे दिसून आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.आरोग्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक पार पडली.यावेळी आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जोस डिसा उपस्थित होते.