गोव्यातील किनारे पर्यटकांनी गजबजले

0
2149

 

 

 

गोवा खबर:देशात इतर राज्यात कोविड मुळे असलेल्या निर्बंधांमुळे देशी पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे गोव्यातील समुद्र किनारे आणि पर्यटनस्थळे गजबजून गेली आहेत.ख्रिसमससाठी आलेले पर्यटक ३१ डिसेंबर साजरा करून जाणार असल्याने पर्यटन व्यवसायिक सुखावले आहेत.

ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्ष साजरे करण्यासाठी देश-विदेशातील लाखो पर्यटक नेहमीच गोव्याला पसंती देत असतात.मात्र यंदा कोविडमुळे राज्यातील पर्यटन उद्योग ठप्प झाला होता. गेल्या चार दिवसांपासून पर्यटकांचे  लोंढे गोव्यात  दाखल होऊ लागले आहेत.
राज्यात येणारे बहुतांशी पर्यटक मास्क, सॅनिटायझर तसेच शारीरिक अंतराचे प्रामाणिकपणे पालन करून सरकारला करोनाबाबत सहकार्य करीत आहेत. पण आनंद आणि उत्साहात न्हाऊन गेलेले अनेकजण मास्क, शारीरिक अंतराकडे दुर्लक्ष करीत आहेत. अशांवर पोलिस दंडात्मक कारवायाही करीत आहेत.
नाताळ आणि त्याला जोडून आलेल्या तीन सुट्यांमुळे देशी पर्यटक मोठ्या प्रमाणात गोव्यात दाखल झाले आहेत.
थर्टी फर्स्ट अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले गोव्याच्या दिशेने वळू लागली आहेत.
राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी राज्यातील पर्यटन खुले केले. त्यानंतर पर्यटकांची काही प्रमाणात ये-जा सुरू होती. करोनामुळे यंदा विदेशी पर्यटकांची संख्या कमी असली, तर देशी पर्यटकांनी मात्र गोव्यालाच पसंती दिली आहे. त्यामुळे दक्षिण आणि उत्तर गोव्यातील सर्वच किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत.
 पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे राजधानी पणजीसह इतर शहरांतील अंतर्गत रस्तेही गजबजून गेले आहेत. पुढील चार दिवसांत पर्यटकांची संख्या आणखी वाढणार असल्याने करोना प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर उभे राहिले आहे.
करोनामुळे गोव्याच्या पर्यटनावर मोठा परिणाम झाला. त्याचा फटका पर्यटनावर अवलंबून असलेल्या हॉटेल्स, टॅक्सी मालक तसेच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही बसला होता. नाताळच्या काही दिवस आधीपासून राज्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले राज्यातील सर्वच व्यावसायिक सुखावले आहेत.