गोव्यातही शिवसेनाच भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार : सुभाष केरकर

0
41

गोवा खबर : पेडणे मतदारसंघातून गेली पंधरा वर्षे सातत्याने राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीतून कार्यरत असणारे धडाडीचे नेतृत्व सुभाष केरकर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना खासदार आणि गोवा संपर्क नेते संजय राऊत यांनी मुंबई येथील निवासस्थानी त्यांचे पक्षात स्वागत केले. सोबत गोवा राज्य प्रमुख जितेश कामत, सरचिटणीस मिलिंद गावस, गोवा राज्य संपर्क प्रमुख जीवन कामत आणि सह संपर्क प्रमुख आदेश परब हजर होते. केरकर यांना पक्षात आणण्यात राज्य प्रमुख कामत यांचा महत्त्वाचा वाटा आहे. केरकर यांचे खंदे समर्थक विलास मळीक आणि दिवाकर जाधव यांनीही केरकर समवेत प्रवेश केला.

केरकर यांनी काही महिन्यांपूर्वी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उत्तर गोवा जिल्हा काॅंग्रेस सरचिटणीसपदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काॅंग्रेस पक्षात राज्य सचिव सारख्या जबाबदारीच्या विविध पदांवर त्यांनी प्रभावीपणे कार्य केलेले आहे. डेमोक्रॅटिक पिपल्स फेडरेशन गोवा सेवाभावी संस्थेतर्फे ते राज्यभर कार्यरत असतात. कित्येक वर्षे पेडणे येथे कार्यरत असल्यामुळें मतदारसंघात खुप लोकप्रिय असून अनेक लोकांशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे.

देशात इतर विरोधी पक्षांच्या आमदार खासदारांना धमकावून आणि विकत घेऊन लोकशाही संपुष्टात आणून एकाधिकारशाहीकडे वाटचाल करीत असलेल्या भाजपाचे मनसुबे उधळून लावत महाराष्ट्रात यशस्वी प्रयोग करण्यात शिवसेनेने सिंहांचा वाटा उचलला. त्यानंतर विरोधी भाजप नेत्यांच्या चारीत्र्यहनन करण्याच्या गलिच्छ राजकीय कारस्थानांना आणि टिकेला भाव न देता कोविड महामारी व्यवस्थापनात देशात अव्वल कामगिरी केलेले मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावीत होऊन मी शिवसेना पक्षप्रवेश करीत असल्याचे केरकर यांनी सांगितले. येत्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातही भाजप पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणे इतर पक्षांना शक्य नसून ही किमया फक्त शिवसेना करू शकते असा दृढ विश्वास असल्याचे मत केरकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत किमान २५ मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार उभे करुन गोयंकारांना एक नवा पर्याय उपलब्ध करून देण्याकडे पक्षाची वाटचाल सुरू असून येणाऱ्या काळात दुसऱ्या फळीतील सक्षम नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार आहे अशी माहिती राज्य प्रमुख कामत यांनी दिली आहे. केरकर हे पेडणे मतदारसंघाचे भावी उमेदवार असण्याची शक्यता कामत यांनी व्यक्त केली आहे.