गोव्याच्या विकासाला स्टार्टअपच्या माध्यमातून वाव- सुरेश प्रभू

0
1141

 

स्टार्टअप मध्ये 2017 या एकाच वर्षात 36 % ने वाढीची नोंद

गोवाखबर:देशाची स्टार्टअप राजधानी होण्याची गोव्यात पूर्ण क्षमता आहे. स्टार्टअप हे राज्याच्या विकासाचे नवे इंजिन ठरु शकते, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज पणजी येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे स्टार्टअप धोरण, योजना आणि स्टार्टअप पोर्टलचे उदघाटन करण्यात आले, याप्रसंगी श्री प्रभू बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान, महसूल खात्याचे मंत्री रोहन खवंटे, मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव अमेय अभ्यंकर यांची उपस्थिती होती.

स्टार्टअप हे पूर्णतः नवनवीन कल्पनांवर आधारित अशी उद्योगशाखा आहे. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या कल्पनांच्या माध्यमातून उद्योगउभारणीची संधी मिळेल. आजचे स्टार्टअप हे भविष्यकाळातील मोठे उद्योजक आहेत. स्टार्टअपमध्ये 2017 या एकाच वर्षात 36 टक्क्यांनी वाढ नोंदवली. यावरुनच आपल्याला याचा आवाका लक्षात येतो,असे सुरेश प्रभू म्हणाले. गोवा हे स्टार्टअपसाठीचे प्रमुख केंद्र ठरु शकते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘इनवेस्ट इंडिया’ च्या माध्यमातून सरकारने राज्यातील गुंतवणुकीसाठी काम सुरू केले आहे. तसेच जुलै महिन्यात बड्या उद्योगांची ज्यात जागतिक बँकेच्याही प्रतिनिधींचा समावेश असेल, अशी एक बैठक राज्यात आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील पायाभूत सुविधा जसे विमानतळ, बंदर, चांगले रस्ते याचा वापर करुन ‘लॉजिस्टीकस हब’म्हणून विकसित करता येईल, असेही सुरेश प्रभू म्हणाले. व्यापार सुलभीकरणासाठी सरकार बदलत्या बाजारपेठेनूसार नियम आणि कायद्यांमध्ये बदल करत आहे.

माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खवंटे याप्रसंगी बोलताना म्हणाले की, राज्यात नॅसकॉमचे कार्यालय आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. गुंतवणूकदारांना अनुकूल ठरेल असे राज्याचे धोरण आहे. त्यामुळे या माध्यमातून रोजगारनिर्मिती आणि महसूल असे दोन्ही उद्दिष्ट साध्य करता येतील. राज्यसरकार लवकरच प्रत्येक घराला ब्रॉडबँडने जोडणार असल्याचे रोहन खवंटे यांनी सांगितले. दोन दिवसाच्या या कार्यक्रमात 100 पेक्षाही अधिक उद्योजक, गुंतवणूकदार, व्यापार मंडळ प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवला