गोवा खबर:दक्षिण गोव्यातील रिवण येथील 16 वर्षांच्या प्रियव्रत पाटीलने सर्वात कमी वयात ‘महापरीक्षा’ उत्तीर्ण होत इतिहास रचला आहे. वयाच्या 16 व्या वर्षी प्रियव्रतने तेनाली परीक्षेच्या (महापरीक्षा) विविध 14 स्तरांमध्ये यश मिळवलं आणि सर्वात कमी वयात ‘महापरीक्षा’ उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचं ट्विटरद्वारे अभिनंदन केरत पाठ थोपटली आहे.
तेनाली परीक्षेचे 14 स्तर असतात आणि वर्षातून दोन वेळा ही परीक्षा होते. जे विद्यार्थी शास्त्रांच शिक्षण घेतात त्यांच्यासाठी ही परीक्षा महत्वपूर्ण असते.


“प्रियव्रतने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचं अभिनंदन. त्याने मिळवलेलं यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल”, असं ट्विट करत मोदींनी प्रियव्रतच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.
“काल श्रीमती अपर्णा आणि श्री देवदत्ता पाटील यांच्या 16 वर्षांच्या मुलाने इतिहास रचला. आपल्या वडिलांकडून वेद व न्यायाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्याने सर्व व्याकरण महाग्रंथांचं श्री मोहन शर्मा यांच्याकडून शिक्षण घेतलं. यासोबतच तेनाली परीक्षेच्या (महापरीक्षा) विविध 14 स्तरांमध्ये घवघवीत यश मिळवून सर्वात कमी वयात ‘महापरीक्षा’ उत्तीर्ण होण्याचा मान त्याने मिळवला”, असं ट्विट चामू कृष्णाशास्त्री यांनी करुन पंतप्रधान मोदींना त्यात टॅग केल होतं. त्याला उत्तर देताना पंतप्रधानांनी प्रियव्रत पाटीलचं अभिनंदन केलं.
ही परीक्षा देणारे विद्यार्थी आपल्या गुरूंसोबत देशाच्या विविध भागात राहतात आणि पारंपारिक ‘गृह गुरुकुल’ प्रणालीनुसार शिक्षण घेतात. वर्षातून दोनदा सर्व गुरु व विद्यार्थी त्यांच्या लेखी व तोंडी परीक्षेसाठी तेनाली येथे एकत्र येतात. विद्यार्थ्यांच्या 5 ते 6 वर्षांच्या अभ्यासानंतर कांची मठाच्या देखरेखीखाली महापरीक्षा’ घेतली जाते. गेल्या 40 वर्षांमध्ये, ‘तेनाली परीक्षा’ शास्त्र अभ्यासाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची संस्था ठरली आहे. ‘इंडिक अकादमी’ सध्या विविध शास्त्राच्या अभ्यासासाठी 40 विद्यार्थ्यांना मदत करत आहे.
प्रियव्रत सध्या तेनाली येथे असून आज तो महागुरुंचे आशीर्वाद घेण्यासाठी आंध्रप्रदेश मधील विजयवाडा येथे जाणार आहे.तेथून उद्या सोलापुर येथे जाऊन 12 सप्टेंबर नंतर गोव्यात परतणार आहे.
तेनाली येथून प्रियव्रतच्या यशाबद्दल बोलताना त्याची आई अपर्णा पाटील म्हणाल्या,प्रियव्रत व्याकरण शास्त्राची महापरीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. चेन्नई येथे कांची शंकराचार्य पीठातर्फे या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
Excellent!
Congratulations to Priyavrata for this feat. His achievement will serve as a source of inspiration for many! https://t.co/jIGFw7jwWI
— Narendra Modi (@narendramodi) September 8, 2019
दोन दोन विख्यात महापंडितांनी सलग दीड तास प्रश्नांच्या अथक फैरी झाडल्या आणि प्रियूने त्याला यशस्वी रीतीनें छान उत्तरे दिली.
आणि अजून एक महत्त्वाचे म्हणजे ही परीक्षा अतिशय कमी वयात उत्तीर्ण होणारा तो पहिलाच छात्र ठरला आहे.
संस्थेच्या१००ते१५० वर्षाच्या इतिहासाचा धांडोळा घेऊन संस्था संचालकांनी मला हे सांगितले.या त्याच्या यशाबद्दल कांचीमठाने महावस्त्र एक लाख रु आणि प्रशस्तिपत्र देऊन त्याचे कौतुक केले आहे.
प्रियव्रतचे वडील पं. देवदत्त पाटील हे न्यायशास्त्र व व्याकरण या दोन्ही शास्त्रांतील प्रकांडपंडित असून ते गोव्यात रिवण या गावात निवासी पाठशाळा चालवतात. विद्यार्थ्यांना मोफत ज्ञानदान करतात. आणि विशेष म्हणजे जातिभेदाच्या भिंती तोडून सर्व जातींच्या विद्यार्थ्यांना शास्त्राचे शिक्षण देतात.
ज्ञानदानाचं शुल्क घेणार नाही असं वचन त्यांच्याकडून घेतल्यावरच त्यांच्या गुरूंनी त्यांना शास्त्र शिकवलं होतं.
