गोव्याच्या नागरिकांमुळे देश-विदेशात काम करण्याची संधी: श्रीपाद नाईक

0
808

गोव्यातील नागरिकांनी विश्वास दाखवून चार वेळा मला निवडून दिले. त्यामुळेच उत्तरं गोव्याचा खासदार, केंद्रीय मंत्री म्हणून केवळ गोव्यामाध्येच नाही तर संपूर्ण देशात व विदेशात काम करण्याची संधी मिळत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी केले.

हळदोणे ग्रामपंचायती मधील खोर्जुवे स्थित कुशे येथील सामुदायिक सभागृहाचे उद्घाटन करताना आज ते बोलत होते. श्रीपाद नाईक यांच्या खासदार विकास निधीतून या सभागृहाचे बांधकाम करण्यात आले.

 

विकासकामे होणे, हे आपले एकट्याचे श्रेय नसून हे सांघिक कार्य आहे. यानिमित्ताने नागरिकांची सेवा करायला मिळते, याचा आनंद आहे, अशी भावना यावेळी नाईक यांनी व्यक्त केली. लोकोपयोगी कामांसाठी निधी वापरला जात आहे, हा पैसा लोकांसाठीच आहे. ज्यांनी ज्यांनी गावातल्या विकासाच्या दृष्टीने ज्या प्रकल्पाची मागणी केली, त्यांना हा निधी उपलब्ध करून देताना समाधान वाटते. आतापर्यंत ८२-८३ सामुदायिक सभागृह उत्तरं गोव्यामध्ये बांधून झाली आहेत. लहान-मोठे  असे सुमारे सातशे प्रकल्प आजवर खासदार विकास निधीतून पूर्ण केले आहेṭ २०१४ साली ‘इंडिया टुडे’ने घेतलेल्या विकास कामातील सर्वेक्षणानुसार उत्तरं गोव्याचा क्रमांक देशात तिसावा होता; तर २०१५ मध्ये ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने घेतलेल्या सर्वेक्षणानुसार उत्तरं गोव्याचा क्रमांक देशात दहावा होता, अशी माहिती नाईक यांनी दिली.

 

कुशेमधील कार्यक्रमानंतर श्रीपाद नाईक यांनी हळदोणे मधील किटला येथील क्रीडा मैदानावर लहान मुलांसाठीच्या बागेचे भूमिपूजन केले. त्यानंतर नाईक यांनी बस्तोडा गावातील स्मशानभूमीच्या विकासकामाचे शिलावरण केले. या स्मशानभूमीसाठी ४३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला असून याचे काम येत्या सात ते आठ महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती नाईक यांनी उपस्थितांना दिली. यावेळी विकास हे सरकारचे प्रमुख ध्येय आहे व नागरिकांची एकही अडचण शिल्लक न ठेवण्याचे उद्दिष्ट असल्याचे नाईक यांनी सांगितले.

 

याप्रसंगी  हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो, सरपंच दीपक नाईक आदि मान्यवर उपस्थित होते.