गोव्याच्या जनतेसाठी चर्चिल आलेमाव यांनी काय केले:आपचा सवाल

0
161
गोवा खबर:राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांची गोवन्स अगेन्स्ट कोरोनावरील टीका हास्यास्पद आहे.बाणावली आणि गोव्याच्या जनतेसाठी आलेमाव यांनी काय केले असा सवाल आप नेता राहुल म्हांबरे यांनी केली आहे.
म्हांबरे म्हणाले,आपवर पुन्हा एकदा एका रिकामटेकड्या आमदाराने हल्ला चढवला आहे. जे काम त्याने व त्याच्या सरकारने करायला पाहिजे होते, ते मात्र ते करीत नाहीत. आज चर्चिल आलेमाव यांनी एक पत्रक जारी करून लोकांचा प्राणवायू स्तर तपासल्याने काहीही निष्पन्न होणार नाही. हे विधान जेवढे चुकीचे व धोकादायक आहे, तेवढेच हास्यास्पद आहे. ऑक्सिमीटर हे कोरोनाच्या विरोधात लढण्याचे एक प्रभावी शस्त्र असल्याचे जागतिक स्तरावर सिद्ध झाले आहे. या आजाराशी लढणाऱ्या लोकांना मदत करणे आलेमाव यांना जमत नसेल तर निदान ज्यांना मदत कशी करावी हे माहित आहे, निदान त्यांना तरी मदत करण्यापासून त्यांनी अडवू नये.
 गोव्यातील कोरोना रुग्णांसाठी तुम्ही आजपर्यंत काय केले आहे? गोवा सरकार याबाबत चांगली सुविधा देण्यात अपयशी ठरले तेव्हा आपण आमदार या नात्याने कितीवेळा सरकारला धारेवर धरून प्रश्न केले? गोमेकॉत जमिनीवर लोकांना झोपणे भाग पडले होते तेव्हा आपण कुठे होता? गोव्यात कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत जाणाऱ्या आकडयांविषयी आपले मत काय आहे? आपल्या बाणावली मतदारसंघातील आपल्या मतदारांना वाचविण्यासाठी आपण आतापर्यंत काय केले आहे,यांची उत्तरे आलेमाव  यांनी द्यावीत असे म्हांबरे म्हणाले.
जागतिक स्तरावर कोरोनाचे निदान करण्यासाठी ऑक्सिमीटरचे महत्व नोंद करण्यात आले आहे. एखाद्या रुग्णाचा प्राणवायू स्तर तपासण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणून ऑक्सिमीटरला सर्वानुमते पसंती व स्वीकृती देण्यात आलेली आहे. असे असतानाही  आलेमाव यांना असे वाटते की सगळ्या जगभरातील वैद्यकीय क्षेत्रामधील तज्ञ लोकांपेक्षा त्यांना जास्त माहित आहे वा ते जास्त हुशार आहेत. आम्ही त्यांच्या विधानावर हसण्यावाचून काही करू शकत नाही,असे सांगून म्हांबरे यांनी आलेमाव यांच्या विधानाची खिल्ली उडवली.
म्हांबरे म्हणाले, बेकार बसलेल्या रिकामटेकड्या आमदारांना आता आमच्या गोवन्स अगेन्स्ट कोरोना  मोहिमेमुळे भीती वाटत असून त्यांना असुरक्षित वाटत आहे. एकतर गोव्यातील जनतेला मदत करा अथवा आमच्या वाटेवरून दूर व्हावे.
 कोविड – 19 महामारीच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत सरकार चांगली कामगिरी करीत आहे. तसे जर असेल तर घरी क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांना देण्यात येणारे ऑक्सिमीटर किट कुठे आहेत, हे चर्चिल आलेमाव सांगू शकतील का? इंडियन मेडिकल असोसिएशनशी संबंधित असलेल्या डॉक्टर गुदिन्हो यांना सुविधा व्यवस्थित उपलब्ध नसल्यामुळे जीव का गमवावा लागला? याचे स्पष्टीकरण चर्चिल आलेमाव देऊ शकतील का,असे प्रश्न म्हांबरे यांनी उपस्थित केले आहेत.