गोव्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रीका काढून पुढील ३ वर्षांसाठी खर्च कपात जाहिर करा :गिरीश चोडणकर

0
435
 गोवा खबर: गोवा सरकार सध्या आर्थिक अडचणीत असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मान्य केल्याने काॅंग्रेस पक्षाने नोव्हेंबर २०१९ मध्ये भाकीत खरे ठरले आहे. गोव्यात सत्तेत आल्यापासुन भाजप सरकारने राज्याल्या कर्जबाजारी करुन राज्यात आर्थिक आणीबाणी लादली व त्यामुळेच आज गोवा दिवाळखोर झाला आहे. सत्य कधीही लपुन राहत नाही व आज कोरोना संकटाच्या वेळी मुख्यमंत्र्याना सत्य मान्य करावे लागले,अशी टिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
चोडणकर म्हणाले, मुख्यमंत्र्यानी ताबडतोब पुढिल तीन वर्षांसाठी खर्च कपात जाहिर करावी. विदेश दौरे, प्रोमोशनल इव्हेंट व कोट्यावधी रुपयांची स्मारके बांधण्याचे सर्व प्रस्ताव बंद करुन जनतेला मदतीचा हात देण्यासाठी पाऊले उचलावीत.
मुख्यमंत्र्यानी राज्याच्या आर्थिक स्थिती विषयी श्वेतपत्रीका काढुन आज सरकारकडे आपत्कालीन संकटाचा सामना करण्यासाठी किती निधी उपलब्द आहे, मुख्यमंत्री सहायता निधीत किती रक्कम शिल्लक आहे, सरकारची तसेच विविध सरकारी आस्थापनांची आज किती रकमेची देणी आहेत हे जाहिर करणे गरजेचे आहे,अशी मागणी करून चोडणकर म्हणाले, ह्या संकटतुन लवकरात लवकर बाहेर पडण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. त्यासाठी सगळ्यानी एकत्र येवून काम करण्याची गरज आहे. गोव्यात आर्थिक व्यवस्थेच्या तज्ञांना घेवून तोडगा काढणे ही वेळची गरज आहे
चोडणकर म्हणाले, मुख्यमंत्र्यानी आता कोरोनासाठीचा लाॅकडावन वाढवण्याची वेळ आली तर सरकारने कोणती तयारी केली आहे याची माहिती लोकांना देणे गरजेचे आहे. आज मोटर सायकल पायलट, गाडेवाले, रस्सा ॲामलेट व इतर खाद्यपदार्थ विकणारे गाडे तसेच दिवसाच्या मिळकतीवर आपला संसार चालविणारे लहान व्यापारी व व्यावयायीक यांच्यासाठी नुकसान भरपाई देण्यासाठी कोणती योजना आखली आहे हे स्पष्ट करणे गरजेचे आहे.
लाॅकडावनमुळे संकटात सापडलेल्या छोटे उद्योग व व्यावसायीकांना सरकारची आर्थिक परिस्थीती ठिक नाही असे सांगुन सरकार मदत करु शकत नाही असे विधान करुन मुख्यमंत्र्यानी हात वर करणे धक्कादायक व दुर्देवी आहे,असे सांगून चोडणकर म्हणाले, आम्ही जेव्हा सत्यपरिस्थीती समोर ठेवुन मुख्यमंत्र्याना वायफळ खर्च कमी करण्याचा सल्ला देत होतो तेव्हा ते विरोधकांची खिल्ली उडवित होते.
भाजप सरकारने गोव्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे प्रयत्न कधीच केले नाही. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांनी खाणबंदिचा तडकाफडकी निर्णय ज्या दिवशी घेतला तेव्हा पासुन राज्याची अर्थव्यवस्था कोसळायला सुरुवात झाली,असा आरोप करून चोडणकर म्हणाले, पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने विदेश दौऱ्यांवर करोडो उधळले परंतु पर्यटन व्यवसाय बळकट करण्यासाठी कसलेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे आज राज्यातला पर्यटन व्यवसाय पुर्णपणे कोसळला आहे. सरकारने किनारे स्वच्छता, जीवरक्षक कंत्राट, म्हादईसाठी वकिलांना कोटी कोटींची रक्कम फेडणे, तिसऱ्या मांडवी पूलावरील वीज खांबावर कोटींचा खर्च, इफ्फि, जिएसटी परिषद, पाटो येथिल स्पेसीस इमारतीचे भाडे,  व अन्य प्रकल्पांवर उढळपट्टी करुन राज्याला दिवाळखोर केले. भाजप सरकारच्या कित्येक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत लोकायुक्तांनीही सिबीआय चौकशीची शिफारस केली आहे.
सन २०१२ पासुन सत्तेवर आलेल्या भाजपच्या तिन्ही मुख्यमंत्र्यानी आपल्या मंत्र्यांच्या व पक्ष कार्यकर्त्यांच्या भ्रष्टीचाराकडे केवळ आपली खुर्ची सांभाळण्यासाठी कानाडोळा केला,असा आरोप करून चोडणकर म्हणाले, त्यामुळेच आज सरकारकडे आपत्कालीन व्यवस्था सांभाळण्यासाठी सुद्धा निधी उपलब्द नाही.
आज पर्यंत कोरोनाच्या बाबतीत सुरक्षित असलेला गोवा सरकारच्या सामाजीक सर्वेक्षण करण्याच्या निर्णयाने “कोरोना डेस्टिनेशन” होण्याचे भिषण संकट आज मुख्यमंत्र्यांच्या अविचारी निर्णयाने समोर उभे ठाकले आहे,असे सांगून चोडणकर म्हणाले, सरकारच्या ७००० कर्मचाऱ्याना ४ लाख घरांमध्ये पाठवुन सरकार कोरोनाचा टाईम बाॅम्ब तयार करत आहे. सरकारने ताबडतोब हा निर्णय रद्द करावा व भिलवाडाच्या धर्तिवर राज्यात सामाजीक स्क्रिनींग व टेस्टिंग सुरू करणे गरजेचे आहे.