गोव्याचे मुख्यमंत्री आता झाले डॉ. मनोहर पर्रिकर

0
1212
गोवा खबर:गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची नवी ओळख आता निर्माण झाली आहे.आयआयटीयन असलेले मनोहर पर्रिकर आता डॉ. मनोहर पर्रिकर म्हणून ओळखले जाणार आहेत.उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत गोवा राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा चौथा पदवीदान सोहळ्यात आज पर्रिकर यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. याप्रसंगी राज्यपाल श्रीमती डॉ मृदूला सिन्हा आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रो. गोपाल मुगेराया यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे 5 पैकी 3 सुवर्णपदक विजेते विद्यार्थी गोमंतकीय होते.

विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी कोणत्याही शॉर्टकट्सचा वापर करु नये, असा सल्ला उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांनी धैर्य, प्रामाणिकपणा, सहानुभूती, संयम आणि आत्मविश्वास या गुणांच्या आधारावर आपली स्वप्ने पूर्ण करावी, असे उपराष्ट्रपती म्हणाले. योग्य मार्गाने वाटचाल केल्यास काहीही अशक्य नाही, असे ते म्हणाले.

अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी जनसामान्यांच्या आवश्यकता लक्षात घेऊन अगदी माफक दरात उपलब्ध होईल असे संशोधन करावे. विशेषतः आरोग्य आणि शिक्षणक्षेत्रात संशोधनासाठी मोठा वाव असल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले. तुम्ही कोणत्याही शिखराव पोहचलात तरी समाज आणि राष्ट्राप्रती आपलं कर्तव्य कधीच विसरता कामा नये, असे ते म्हणाले.
भारतात 2030 पर्यंत उच्च मध्यमवर्गीयांची संख्या मोठ्या प्रमाणात असेल, त्यामुळे विविध क्षेत्रात काम करण्याच्या संधी कुशल युवकांना मिळतील. याप्रसंगी बोलतना उपराष्ट्रपतींनी शिक्षकांना सांगितले की, विद्यार्थी स्वयं-रोजगार प्राप्त करतील, याकडे त्यांनी पाहावे. सरकारचा ‘स्कील इंडिया’कार्यक्रम त्याच दिशेने असल्याचं ते म्हणाले.
स्वातंत्र्यप्राप्तीच्या 71 वर्षांनंतरही आपणास दारिद्र, निरक्षरता, आरोग्य, शेतीचे प्रश्न आणि महिला आणि दुर्बल घटकांवरील अत्याचार, बालकामगार, दहशतवाद, जातीवाद, भ्रष्टाचार या समस्येने ग्रस्त आहोत. नव भारत निर्माण करण्यसाठी या सर्व दुष्प्रवृत्तींना हद्दपार केले पाहिजे. शिक्षणाचे महत्व विशद करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, शिक्षण केवळ रोजगारासाठी नाही तर शिक्षणामुळे सबलीकरण प्राप्त होऊन विद्यार्थ्यांना जागतिक नागरिक बनण्याच्या दृष्टीने त्यांच्या ज्ञानकक्षा रुंदावतात, असे ते म्हणाले.
 
उपराष्ट्रपती पुढे म्हणाले की, उच्च शिक्षण हे कालानुरुप असले पाहिजे. लाखो विद्यार्थ्यांना कोणत्याही कौशल्याशिवाय पदवी देणे थांबले पाहिजे. विद्यापीठांनी उद्योगांशी सुसंगत अभ्यासक्रम आणि शिक्षणपद्धती अनुसरण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
गोवा राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने याप्रसंगी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. मुख्यमंत्र्यांच्या वतीने प्रो. गोपाल मुगेराया यांनी पदवी स्वीकारली. पदवीदान सोहळ्यात पाच विद्यार्थ्यांना डॉक्टरेट, 42 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, 86 विद्यार्थ्यांना पदवी  प्रदान करण्यात आली.