गोव्याचे मानकुराद आंबे आणि काजूचे बिबे वाजपेयींना फार आवडायाचे

0
1292

   

    गोवा खबर :माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रधांजली वाहताना गोव्यातील भाजप नेत्यांनी वाजपेयी यांच्याशी निगडीत गोव्यातील आठवणींना उजाळा दिला.वाजपेयी यांना गोव्याचे मानकुराद आंबे आणि काजूचे बिबे(काजूचे हिरवे गर) फार आवडायचे. आंबा आणि काजूच्या हंगामात राष्ट्रीय कार्यकारिणी असली की गोव्यातून जाणारे कार्यकर्ते आवर्जून त्यांच्यासाठी मानकुराद आंबे आणि काजूचे बिबे घेऊन जात अशी आठवण भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी वाजपेयी यांना श्रधांजली वाहिल्या नंतर जागवल्या.

  तेंडुलकर म्हणाले,वाजपेयी यांनी नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे.गोव्यात 2004 साली सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी वाजपेयी यांनी दक्षिण गोव्यातील बाणावली किनाऱ्याची निवड केली होती.सायंकाळी किनाऱ्यावर बसून त्यांनी सूर्यास्त अनुभवला होता.त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी प्रयत्न करून त्यावेळच्या 10 आमदारांची वाजपेयींशी भेट घालून दिली होती.त्यात सहभागी प्रत्येकासाठी वाजपेयी यांचे मार्गदर्शन आज देखील प्रेरणादायक वाटत आहे,असे तेंडुलकर म्हणाले.
  अटलजींच्या निधनाने दुःखी झालो:पर्रिकर

  माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने आपल्याला अतीव दुःख झाले असून भारताने अटलजींच्या रूपाने महान नेता गमावला आहे,अशी प्रतिक्रिया उपचारासाठी अमेरिकेत गेलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी ट्विटर द्वारे व्यक्त केली आहे.
  पर्रिकर यांनी आपल्या ट्वीट मध्ये वाजपेयी हे दूरदृष्टी असलेले लोकनेते होते असे म्हटले आहे.वाजपेयी यांनी आपले पूर्ण जीवन देशाच्या आणि लोकांच्या सेवेसाठी वाहिले असल्याचा उल्लेख देखील पर्रिकर यांनी केला आहे.
  माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी देखील वाजपेयी यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.पार्सेकर म्हणाले,वाजपेयी गोव्यात आले की कार्यकर्त्यांच्या घरात राहणे पसंत करत.पणजी मध्ये आले की वाजपेयी माधव धोंड यांच्या घरी सर्वसामान्य कार्यकर्त्या सारखे रहायचे.
  एकदा दाबोळी विमानतळावर उतरल्या नंतर वाजपेयी हे राजेंद्र आर्लेकर यांच्या दुचाकीवर मागे बसून त्यांच्या घरी गेले होते.तेथे त्यांनी आंघोळ करण्यासाठी गरम पाण्याशिवाय काही मागितले नव्हते,त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणा द्यायची असे पार्सेकर म्हणाले.पार्सेकर यांनी मुख्यमंत्री बनल्या नंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीत जाऊन वाजपेयी यांच्या पायावर माथा टेकुन आशीर्वाद घेतले होते.
   
  दरम्यान,उद्या भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर,केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, विधानसभा सभापती डॉ. प्रमोद सावंत आणि पंचायतमंत्री माविन गुदीन्हो दिल्ली येथे जाऊन वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेणार आहेत.