गोव्याचे ‘बडे अब्बू’ निघाले झारखंडला 

0
1045
 
  • कोंकणी सिनेमाची पहिल्यांदाच झाली निवड
  • देशभरातील निवडक सात सिनेमामध्ये स्थान 
 गोवा खबर:गोव्याच्या ग्रामीण भागातील एका ट्रक ड्रायव्हर आणि त्याच्या कुटुंबाच्या संघर्षाची गोष्ट सांगणाऱ्या ‘बडे अब्बू’ या कोंकणी सिनेमाची जमशेदपूर, झारखंड येथे १५ ते १७ ऑकटोबर दरम्यान होत असलेल्या राष्ट्रीय सिनेमहोत्सवामध्ये निवड झाली आहे. या निवडीसह देशभरातील विविध भाषांतील सात निवडक सिनेमांमध्ये कोंकणी ‘बडे अब्बू’ने मानाचे स्थान पटकावले आहे.
याला महोत्सवात आजवर प्रदर्शित होणारा हा पहिला आणि एकमेव कोंकणी सिनेमा असल्याचे महोत्सवाच्या आयोजकांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात विशेष नमूद केल्याचे या सिनेमाचे निर्माते दिलीप बोरकर आणि श्यामराव यादव यांनी सांगितले.
‘बडे अब्बू’ या एकाचवेळी कोंकणी आणि हिंदी अशा दोन स्वतत्र भाषेत चित्रीकरण करण्यात आलेल्या गोव्यातील सिनेमातून सर्वसामान्य ट्रक डायव्हर आणि त्याच्या कुटुंबाच्या संघर्षाची विविधस्तरीय कथा मांडण्यात आली असून पत्रकार हिना कौसर खान यांच्या लघुकथेवर नितीन सुपेकर आणि किशोर अर्जुन यांनी कथाविस्तार आणि पटकथा लिहिली असून, ज्येष्ठ साहित्यिक रमेश भगवंत वेळुस्कार आणि किशोर अर्जुन यांनी संवाद लिहिले आहेत. दिग्दर्शन नितीन सुपेकर यांनी आणि या सिनेमाची निर्मिती दिशा क्रिएशनचे दिलीप बोरकर आणि अस्तोनिया एन्टरटेनमेन्ट प्रा. ली.चे श्यामराव यादव यांनी केली आहे.
गोमंतकीय कलाकारांची मांदियाळी
‘बडे अब्बू ‘मध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते राजेश शर्मा, दिपलक्ष्मी मोघे, रावी किशोर, कॅसिओनो ‘ऍडी’ डिसोझा, देवांशी सावंत हे प्रमुख भूमिकेत असून, प्रसिद्ध पत्रकार किशोर नाईक गांवकर आणि राजेश त्रिपाठी खलभूमिकेत आहेत. त्याचसोबत प्रकाश नावलकर, सुदेश भिसे, गौरी कामत, अभिषेक म्हाळशी, उगम जांबावलिकर, अंकिता सावंत, चेतना नाईक, व्यंकटेश नाईक, फेर्मीन, राजेश कारेकर, सिद्धी उपाध्ये, आरती भोबे, संजय गांवकर आदीसह विविध गोमंतकीय कलाकारांची मांदियाळी आहे. सिनेमाचे चित्रीकरण प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर गिरीश जांभळीकर यांनी केले असून सतीश गांवकर, नितीन बोरकर यांनी कला विभाग सांभाळला आहे.
सर्वसामान्य कामागाराची गोष्ट सांगणारा आमचा सिनेमा गोमंतकीय विविध कलाकारांच्या संपन्न अभिनयातून साकारला आहे. त्यामुळे झारखंडमध्ये होणाऱ्या या राष्ट्रीय सिनेमहोत्सवात निवडक सात सिनेमासोबत ‘बडे अब्बू’ प्रदर्शित होणे ही आमच्यासाठी तसेच गोव्यातील सिनेचळवळीसाठी उत्साहाची बाब आहे. कोंकणी भाषेत अधिकाधिक आशयसमृद्ध सिनेमे  होत आहेत, आम्ही या सिनेमाच्या माध्यमातून या सगळ्याला सक्रिय  हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहोत. विविध महोत्सवासाठी सध्या सिनेमा पाठवण्यात आला असून, लवकरच सिनेमा राज्यभरात रसिकांच्या भेटीला येणार आहे.
– दिलीप बोरकर, श्यामराव यादव 
निर्माते, बडे अब्बू