गोव्याची वाटचाल मध्यावधीच्या दिशेने:उपसभापती लोबो

0
1023
गोवा खबर :मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आजारपणाचे परिणाम सरकार वर होऊ लागले आहेत.प्रशासन ठप्प झाल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सतत केला जात आहे.आता उपसभापती मायकल लोबो यांनी सरकारला घरचा अहेर देत सरकार मध्ये ऑल इज नॉट वेल असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.गोवा मध्यावधी निवडणुकांच्या दिशेने जात असल्याचे भाकित देखील लोबो यांनी वर्तवत सरकारला जोरदार धक्का दिल्याचे मानले जात आहे.

विद्यमान भाजप आघाडी सरकार घडवण्यात लोबो यांची महत्वाची भूमिका आहे.लोबो हे सरकारसाठी किंग मेकर म्हणून ओळखले जातात.त्याच लोबो यांनी सरकारी नोकर भरती होत नसल्या बद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त करत भाजपची डोकेदुखी वाढवली आहे.
 राज्यात सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत पण नोकऱ्या दिल्या जात नाहीत. मुख्यमंत्री नोकऱ्यांच्या फाईल्स घेऊन बसले आहेत. राज्यात लोकांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. खाण प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. सरकारची एकूण दिशाच भरकटली आहे. लोकांनी आता जागे होऊन आपापल्या आमदारांना सरकारच्या कामाविषयी जाब विचारावा, असे आवाहन लोबो यांनी आज केले.
 मंत्रिमंडळात नवे मंत्री घेताना डावलले गेल्याची भावना लोबो यांच्या मनाला दुखवणारी ठरली असल्याचे सांगितले जात आहे.लोबो यांना मंत्रीमंडळात घ्यावे यासाठी त्यांच्या समर्थकांनी भाजप नेत्यांचे दरवाजे ठोठवले होते.
 सध्याची स्थिती पाहता राज्य मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे मत लोबो यांनी व्यक्त केल्याने भाजपची गोची झाली आहे.
लोबो यांनी आज मुख्यमंत्री  पर्रीकर यांना देखील सोडले नाही. मुख्यमंत्र्यांवर लोकांनी विश्वास ठेवला पण त्यांनी आपली आश्वासने पूर्ण केली नाहीत, अशी टीका त्यांनी केली. सरकारची दिशा भरकटली आहे. ते चुकीच्या मार्गाने चालले आहे. मुख्यमंत्र्यांना असे सांगून कळत नाही, त्यामुळे घटक पक्षांनी दिल्लीत जाऊन मुख्यमंत्र्यांच्या कानात या साऱ्या गोष्टी सांगाव्यात, असे लोबो म्हणाले.
तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत  पार्सेकर यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये सरकारी खात्यांमध्ये नोकर भरती बंदी लागू केली तेव्हापासून आतापर्यंत सरकारी नोकर भरती झाली नाही. सध्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २०१७ मध्ये आपल्या भाषणात राज्यात सरकारी व खासगी क्षेत्रात रोजगार निर्माण करणार असे म्हटले होते. पण प्रत्यक्षात काहीच झालेले नाही असे निदर्शनास आणून देत लोबोंनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
लोबो म्हणाले,मी स्वत: ५०० खासगी नोकऱ्या थेट दिल्या आहेत पण सरकारी क्षेत्रात नोकर भरती जी बंद केली आहे ती अजूनही सुरू झालेली नाही. शिक्षकांच्या पदांची जाहिरात झाली पण त्याचे पुढे काही झाले नाही.
आम्ही मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहीले आहे, ३ हजार सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत. कळंगुट सारख्या पर्यटन भागात मोठ्या प्रमाणात पोलिसांची आवश्यकता आहे. २०१२ मध्ये शेवटची भरती झाली तेव्हापासून आजपर्यंत पोलिस भरती झालेली नाही. आज गोमंतकीय तरुण अस्वस्थ होऊन फिरत आहेत. खाण क्षेत्रातही अस्वस्थता वाढली आहे. लोक नाराज झाले आहेत. सरकार नोकऱ्याही देत नाही, अन् काही उपायही करत नाही. खाणी सुरू करण्यासाठी केंद्राकडून अध्यादेश काढण्याची आवश्यकता आहे, तेही काम होत नाही. आरोग्य, पोलिस, होमगार्ड यासह मी अध्यक्ष असलेल्या पीडीएकडेही नोकऱ्या उपलब्ध आहेत पण नोकर भरती करण्याची परवानगी सरकार देत नाही, असे ते म्हणाले.
अनेकजण भारतीय नागरिकत्व सोडून लंडनला नोकरीला गेले कारण सरकार त्यांना नोकऱ्या देत नाही.
मुख्यमंत्र्यांकडून घोर निराशा
मध्यमवर्गीय, गरीब अत्यंत नैराश्येत आहे हेच चित्र पाहून मुख्यमंत्री राज्यभर फिरले म्हणून त्यांना यापूर्वी २१ जागा दिल्या होत्या पण आज लोकांना त्याचा पश्चाताप होत आहे. मुख्यमत्र्यांनी लोकांना जी आश्वासने दिली होती ती अपूर्ण राहिली आहेत, अशी टीका लोबो यांनी केली.
मुख्यमंत्री नेमके असे का करत आहेत ते कळत नाही. ते नोकऱ्यांच्या सगळ्या फाईल्स घेऊन का बसले आहेत त्याचे नेमके कारण कळत नाही, घटक पक्षांनी त्यांना याविषयी विचारावे अशी मागणी लोबो यांनी केली.
नोकऱ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत पण त्या दिल्या जात नाहीत. आघाडी सरकारमधील घटक पक्षांना माझे आवाहन आहे की त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जाऊन भेटावे आणि नोकऱ्यांचा प्रश्न निकालात काढावा. मी बेरोजगार तरुणांचा प्रतिनिधी म्हणून बोलत आहे. सरकार कुठल्या दिशेने चालले आहे ते मला कळत नाही, लोक संतापलेले आहेत, लोकांमध्ये नैराश्य आहे. सरकारची चुकीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, सरकार योग्य मार्गावर यावे अशी अपेक्षा लोबो यांनी व्यक्त केली.