गोव्याचा घात करणाऱ्यांना नैसर्गिक न्याय मिळाला : गिरीश चोडणकर 

0
109
गोवा खबर : गोवा राज्याला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. गोमंतकीयांनी नेहमीच निसर्गाची पूजा केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संगनमत करुन आमची माता व जीवनदायीनी म्हादई नदीचा कर्नाटकशी सौदा करून गोव्याचा विश्वासघात करणाऱ्या माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची मंत्रीमंडळातुन झालेली हकालपट्टीने त्यांना नैसर्गिक न्याय मिळाला आहे अशी घणागाती टीका कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
म्हादईचा सौदा करण्याच्या कारस्थानात सामील झालेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ही लवकरच सजा होणार असुन गोमंतकीयांच्या भावनांशी खेळ मांडणाऱ्यांसाठी हा एक धडा आहे असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.
उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक हे आता पोर्टस, शिपींग व वॉटरवेज तसेच पर्यटन खात्याचे राज्यमंत्री झाले आहेत. आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र ताबा त्यांच्याकडुन काढल्याने केंद्रीय मंत्रीमंडळातुन त्यांची पदनावती झालेली आहे. परंतु, गोव्यासाठी ही चांगली गोष्ट असुन, गोव्याची किनारपट्टी व नद्या मोदींच्या क्रोनी क्लबच्या घशात घालण्यासाठी ते देणार नाहीत अशी आशा मी बाळगतो असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.
गोव्यातील रसातळाला गेलेला पर्यटन उद्योगाला चालना देत ते राज्याचे पर्यटन मंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांच्या ‘मिशन ३० टक्के कमिशनला” आळाबंद घालण्याचे काम त्यांना सर्वप्रथम करावे लागेल असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.
अत्यंत वाईट परिस्थितीतून आपला देश जात असुन, वाईट हवामानातुन मार्ग काढण्यासाठी खरेतर विमानाचे दोन्ही पायलट बदलणे गरजेचे होते. परंतु, त्यांना हात न लावता भाजपने विमानातील इतर कर्मचारी बदलेले आहेत. मंत्रीमंडळ फेररचनेतुन देशाला काहिच फायदा होणार नसल्याचा दावा गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
कोविडच्या गैरव्यवस्थापनाने हजारो लोकांचे बळी घेणाऱ्या अकार्यक्षम आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळाले आहे. समाज माध्यमांवर नियंत्रण आणुन जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणारे बेजबाबदार केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांचाच आवाज आता बंद झाला आहे. या दोन्ही मंत्र्यांच्या जाण्याने आरोग्य व माहिती तंत्रज्ञान व कायदा क्षेत्रात सकारात्मक बदल होतील अशी आशा आपण बाळगुया.
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणुन नेमणुक झालेले राजेंद्र आर्लेकर  यांनी आपल्या भाजप सदस्यत्वाचा राजिनामा दिला हे स्वागतार्ह आहे. परंतु, पक्षिय राजकारण करुन ते गोव्याची मान लाजेने खाली घालणार नाहीत अशी अपेक्षा करुया. त्यांनी घटनेच्या चौकटीत राहुनच आपली जबाबदारी पार पाडावी अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
कॉंग्रेस पक्ष नवनियूक्त मंत्र्यांच्या कारभारावर तसेच भाजप सरकारच्या प्रशासनावर कडक नजर ठेवणार असुन, नवीन मंत्र्यांनी गोव्याच्या अस्मितेशी खेळू नये तसेच गोमंतकीयांच्या भावनांचा मान राखावा असे आवाहन गिरीश चोडणकर यांनी केले आहे.