गोवा हा गोमंतकीयांसाठी, अदानींसाठी नव्हे : आप

0
226
गोवा खबर: गोव्यातले सर्व निर्णय, गोवेकरांसाठी गोवेकरांनीच घेतले पाहिजेत. गोवा ही काही केंद्र सरकार अथवा भाजपच्या राज्यांच्या मालकीची वसाहत नव्हे. गोव्याचे भवितव्य दिल्ली नव्हे तर गोवेकरच ठरवतील,अशी आम आदमी पक्षाची ठाम भूमिका आहे,असे आपचे प्रवक्ता सुरेल तिळवे यांनी स्पष्ट केले.  
प्रमोद सावंत सरकारने अदानींच्या फायद्यासाठी जी पाऊले उचललेली आहेत, त्याच्याविरुद्ध गोमंतकीय जनता गेले काही महिने निकराने लढा देत आहे. तथापि,भाजप सरकारने लाखो गोवेकरांच्या आवाजाकडे जाणूनबुजून कानाडोळा करून दुर्लक्ष करताना त्यांच्या विरोधाला काडीचीही किंमत दिलेली नाही,असा आरोप तिळवे यांनी आज पणजी येथील आपच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला.
 तिळवे म्हणाले,आम आदमी पक्ष सरकारला याविषयी जाब विचारात आहे . जनता ज्या प्रकल्पांना विरोध करत आहे त्यापैकी कोणते निर्णय गोवेकरांच्या परवानगीने घेण्यात आलेले आहेत. गोवेकरांचा आवाज तुम्हाला महत्वाचा का वाटत नाही, सर्वसामान्य अशा लाखो गोमंतकीय लोकांपेक्षा एका तद्दन व्यावसायिक उद्योगसमूहाच्या व्यावसायिक स्वार्थाचे वावडे तुम्हाला जास्त महत्वाचे का वाटते, गोव्यातील जंगले, वनप्रदेश, पर्यावरण आणि नैसर्गिक स्रोत या सर्वांवर पहिला हक्क  गोवेकरांचा कि अदानींचा आहे,प्रमोद सावंत यांनी गोव्याला केंद्र सरकारच्या स्वार्थासाठी त्यांच्या इच्छेचे मोहताज आणि लाचार का बनवलेले आहे,असे प्रश्न देखील तिळवे यांनी यावेळी उपस्थित केले.
एका सामान्य गोवेकरासाठी स्थानिक रस्त्याची डागडुजी होईल अशी अपेक्षा धरणे वा पूर्ण होणे अशक्य होऊन बसते पण, त्याचवेळी सरकार बहुमार्गीय महामार्ग केवळ अदानींसाठी कोळसा वाहतूक करण्याच्या दृष्टीने फायदेशीर व्हावा यासाठी शक्य ते सर्व काही करते,असा आरोप करून तिळवे म्हणाले, या विषयावर गोव्यातील जनतेबरोबर चर्चा का करण्यात आली नाही, गोव्यातील जनतेला 24 तास आठवड्याचे सातही दिवस अखंडित वीज पुरवठा मिळालेला नाही पण उच्च दाबाच्या वीज वाहिन्या लोकांच्या घरांच्या वरील भागावरून नेण्यात येतात आणि या गावांमधील लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो याचाही विचार हे तथाकथित पार्टी विथ डिफरन्स  सरकार करीत नाहीत.
गोव्यात खाणी आणि शाश्वत खाण व्यवसाय गोवेकरांना नोकऱ्या देण्यासाठी सुरु करण्याच्या दृष्टीने सरकारने काहीही गंभीर पाऊले उचललेली नाहीत. पण अदानींना गोव्यात जे हवे आहे ते उपलब्ध करून देण्यासाठी हे काहीही करायला तयार आहेत,असा आरोप तिळवे यांनी केला आहे.
प्रमोद सावंत साहेब सर्वसामान्य गोवेकर कि तुमच्या पक्षाला देणग्या देणारे लोक,यातील तुम्हाला कोण महत्वाचे आहेत,असा प्रश्न करून तिळवे म्हणाले, केंद्र सरकारपुढे भाजप सरकार गोवेकर जनतेचे हक्क आणि त्यांच्या भल्याचे मुद्दे घेऊन उभे राहिलेले नाही.  केंद्र सरकार हे केवळ उद्योग व्यवसाय कारखाने चालवणाऱ्या समुदायाचे हीत बघत आहे.मुख्यमंत्री केंद्राच्या हातचे बाहुले बनलेले आहेत. गोवेकरांच्या जीवाची किंमत प्रमोद सावंत यांना महत्वाची वाटत नाही. सध्याचे सरकार गोव्याला कोळशाचे केंद्र बनवू पाहत आहे आणि गोव्याचा वापर करून अदानीचा कोळसा जहाजाच्या माध्यमाने संपूर्ण देशभर नेण्याचा मनसुबा आहे. याची फारच मोठी जबर किंमत गोव्याला चुकवावी लागणार आहे.
गोवेकरांच्या जीवनावर आणि पर्यावरणावर या कोळसा प्रकल्पाचा भयंकर वाईट परिणाम होणार आहे. काही तुरळक खाजगी फायद्यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प हाती घेणे यात काहीतरी अर्थ आहे. जगभरातील राष्ट्रे आज कोळसामुक्त होत आहेत आणि कोळशापासून हात झटकत आहेत कारण कोळसा हा अतिशय अशुद्ध वा घाणेरडा ऊर्जा स्रोत आहे. काही लोकांचे खिसे भरण्यासाठी सरकार हजारो गोवेकर लोकांचे जीव धोक्यात घालण्यासाठी हपापलेली आहे, हे निश्चितच चिंताजनक आहे. गोवा हा गोवेकरांसाठी आहे, अदानींसाठी नव्हे.  गोवेकर जनता हीच अंतिम निर्णय घेणारी असली पाहिजे. गोव्याला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर अंतिम निर्णय घेणारी शेवटची अंतिम अधिकारीणी हे गोव्यातील लोक सर्वसामान्य जनता असली पाहिजे, केंद्र सरकार नव्हे,असे तिळवे यांनी यावेळी ठणकावून सांगितले.