गोवा स्वतंत्र झाल्याच्या  60 व्या जयंती निमित्त आयोजित सोहळ्यांच्या शुभारंभ प्रसंगी भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे संबोधन

0
248

 

1.      आजचा दिवस गोव्यासाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी विशेष स्मरणीय आहे. सुमारे 450 वर्षांच्या वसाहतवादी राजवटीनंतर  1961 मध्ये आजच्याच दिवशी गोव्याला परकीय राजवटीतून मुक्त करण्यात आले होते. आज आपणा सर्वांबरोबर संपूर्ण देश  गोव्याच्या  60 व्या मुक्तिदिनाचा  उत्सव साजरा करत आहे. परदेशी राजवटीपासून गोवा मुक्त झाल्याच्या या  ऐतिहासिक प्रसंगी तुम्हा सर्वांबरोबर उपस्थित राहताना मला खूप आनंद झाला आहे. मी तुम्हा सर्वांचे या  गौरवशाली दिनानिमित्त अभिनंदन करतो.

2.      गोव्यात वसाहतवादी राजवटीचा पाया 1498 मध्ये  वास्को द गामाच्या भारत आगमनादरम्यान रचला गेला होता. पोर्तुगीजांनी 1510 मध्ये गोव्यावर कब्जा केला. हळूहळू ते लोकांच्या  धार्मिक आणि  सांस्कृतिक परंपरांवर  नियंत्रण स्थापित करू लागले. लोकांचे नागरिक स्वातंत्र्य हिरावून घेऊ लागले. विरोधात  आवाज उठवणाऱ्यांना तुरुंगात डांबून ठेवले जात होते. जनतेचे शोषण केले जात होते. स्थानिक अर्थव्यवस्था नष्ट केली जात होती, ज्यामुळे गरीबी वाढतच चालली होती.

3.      गोव्याची संस्कृती आणि अर्थव्यवस्थेवर पोर्तुगाल राजवटीच्या  विनाशकारी प्रभावाचे जीवंत चित्रण, महान स्वातंत्र्यसैनिक आणि  विद्वान त्रिस्ताव दे ब्रगेंजा कुन्हा यांनी आपल्या प्राचीन ‘फोर हंड्रेड इयर्स ऑफ फॉरेन रूल’ आणि  ‘द डी नॅशनलायझेशन ऑफ गोअन्स’ पुस्तकात केला आहे.

बंधू आणि भगिनींनो,

4.      महात्मा गांधी म्हणायचे की काश्मीर किंवा अन्य कोणत्याही राज्याप्रमाणे गोवा देखील भारताचा भाग आहे. भारताची  एकता आणि अखंडता यावर त्यांचा अतूट  विश्वास होता. त्यांच्या या विश्वासाची  पुष्टि, 1929 च्या या वक्तव्यातून होते की आपला देश  ब्रिटिश, पोर्तुगाल , फ्रांस वसाहतींमध्ये विभाजित राहणार नाही तर एकसंध राहील.

5.      गोव्याच्या मुक्तीचा संघर्ष बराच काळ चालला. याचा अंतिम टप्पा जून 1946 मध्ये सुरु झाला जेव्हा नागरिक स्वातंत्र्य निलंबनाला विरोध केल्याबद्दल डॉ. राम मनोहर लोहिया यांना  त्यांच्या धाडसी सहकाऱ्यांसह गोव्यात अटक करण्यात आली. गांधीजींप्रमाणे  डॉक्टर लोहिया यांचे देखील हेच मत होते की  गोमंतक क्षेत्र भारताचा भाग आहे. त्यांची प्रशंसा करताना गांधीजी म्हणाले  होते, “माझ्या राजकारणापेक्षा  डॉक्टर लोहिया यांचे राजकारण कदाचित भिन्न आहे मात्र तरीही मी त्यांच्या गोव्याला जाण्याची आणि तिथल्या पोर्तुगाल राजवटीच्या काळ्या कृत्यांकडे इशारा केल्याची प्रशंसा केली आहे. जोपर्यंत संपूर्ण भारत पुन्हा आपले स्वातंत्र्य मिळवत नाही तोपर्यंत गोव्याचे नागरिक आपल्या स्वातंत्र्याची प्रतीक्षा करू शकतात. मात्र अशा प्रकारे कुणीही व्यक्ती किंवा समाज आपला सन्मान न गमावता नागरिक स्वातंत्र्याशिवाय राहू शकत नाही. डॉक्टर लोहिया यांनी जी  मशाल पेटवली आहे ती जर गोवेकरांनी विझू दिली तर त्यांचे नुकसान होईल.”

6.      आपणा सर्वांच्या पूर्वजांनी, स्वातंत्र्याची मशाल विझू दिली नाही. ती धगधगती ठेवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. आजच्या या प्रसंगी मी आपल्या पूर्वजांच्या त्याग आणि बलिदानाचे  स्मरण करतो आणि त्यांना शतशः  नमन करतो.

बंधू आणि भगिनींनो,

7.      गोव्याच्या मुक्तीचा संघर्ष केवळ नागरिक स्वातंत्र्यासाठी नव्हता. तो, भारताबरोबर पुन्हा एकसंध होण्याच्या प्रदीर्घ इच्छेच्या पूर्ततेचा संघर्ष देखील होता.या इच्छेची  अभिव्यक्ति, मुक्ति संघर्षात तिरंग्याच्या वापरात स्पष्ट दिसून येत होती. राजकीय संघर्षासाठी गांधीवादी मार्ग अवलंबणे हे देखील याच भावनिक एकतेचा भाग होता.

8.      गोव्याला मुक्त करण्यासाठी सर्व समुदाय आणि संघटना वसाहतवादी सत्तेविरुद्ध एकत्रितपणे लढल्या. आजाद गोमांतक दल, गोवा विमोचन समिति, गोवा मुक्ति सेना आणि  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकजुट झाले. फ्रांसिस्को लुइस गोमेस यांनी  ‘गोमांतकी इंडियन नॅशनलीझम’ चा आवाज बुलंद केला आणि  लुइस दे मेनेज़ेस ब्रगेंज़ा यांनी गोव्याच्या स्वातंत्र्याबरोबर भारताबरोबरच्या एकीकरणाची घोषणा केली.

9.      15 ऑगस्ट 1955 रोजी महान स्वातंत्र्य सैनिक एन.जी. गोरे यांच्या नेतृत्वाखाली एक विशाल सत्याग्रह सुरु करण्यात आला. गोव्याबाहेरचे  भारतवासी, स्थानिक मुक्ति आंदोलनांचे  समर्थन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने गोव्यात दाखल झाले. स्वातंत्र्यलढ्यातील व्यापक लोक सहभाग पाहून वसाहतवादी शासक आश्चर्य-चकित झाले.

10.    विशाल जन-समर्थन पाहून  भारत सरकारने देखील आपल्या राजनैतिक प्रयत्नांना गती दिली  मात्र वसाहतवादी शासक सत्तेवरून पायउतार होण्यास तयार  झाले नाहीत.  अंतिम पर्याय म्हणून  17 डिसेंबर  1961 रोजी ‘ऑपरेशन विजय’ सुरु करण्यात आले. दोन दिवसांनंतर म्हणजे आजच्याच दिवशी 19 डिसेंबर रोजी गोव्याचे गव्हर्नर  जनरल, मैनुअल एंटोनियो वासालो दा सिल्वा यांनी शरणागती पत्करली. गोवा पुन्हा भारताचा भाग बनले.

बंधू आणि भगिनींनो,

 

11.    गोव्याच्या या 160 किलोमीटर लांबीच्या समुद्रतटावर, जगातील काही सर्वात सुंदर समुद्रकिनारे आहेत. गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम, अद्वितीय आहे आणि इथले लोकही ‘अतिथी देवो भव’ परंपरेचे मनःपूर्वक पालन करणारे आहेत. माझा स्वतःचा गोव्याविषयीचा अनुभवही याच भावनेला पाठबळ देणारा आहे.संसदीय प्रतिनिधीमंडळाचा संयोजक म्हणून इथे आलो असतांना इथल्या विलोभनीय सागर किनाऱ्यांनी आणि हिरव्यागार वनश्रीने मला खूप प्रभावित केले होते. इथल्या लोकांच्या आदरातिथ्यामुळे मी गोव्याचा कायमचा प्रशंसक झालो आहे.

12.    इथल्या लोकांनी समान नागरी संहितेचा स्वीकार केला आहे, ही गोव्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या निर्णयामुळे इथल्या सांस्कृतिक विविधतेला चालना मिळाली आहे. गोव्यातल्या आमच्या बंधू-भगिनींनी लोकशाही व्यवस्था आणि सुशासन मजबूत ठेवण्यासोबतच, धार्मिक सलोखाही कायम राखला आहे. जनतेचा सक्रीय सहभाग असलेल्या प्रशासनाचे हे आगळे  उदाहरण म्हणजे गोव्यातील लोकांच्या पुरोगामी विचारांचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

बंधू आणि भगिनींनो,

13.    जेव्हा गोव्याला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा तिथे पायाभूत सुविधा आणि उद्योगधंद्यांचा विकास झाला नव्हता. आज जेव्हा गोवा आपल्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्षात प्रवेश करतो आहे, तेव्हा हे बघून अत्यंत अभिमान वाटतो की दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत हे राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. याचे श्रेय, गोव्यातले मेहनती लोक, लोकप्रतिनिधी, लोकसेवक आणि उद्योगक्षेत्राला जाते.

14 हे यश अत्यंत कठोर परिश्रमांमुळे मिळाले आहे आणि यात सध्याच्या तसेच आधीच्या सरकारांचेही अतिशय महत्वाचे योगदान आहे. माजी मुख्यमंत्री श्री दिगंबर कामत आज या समारंभाला उपस्थित आहेत. राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मी त्यांचे आणि आपल्या सगळ्यांचेही अभिनंदन करतो.

 

15     आज जेव्हा संपूर्ण देश ‘आत्मनिर्भर भारताचा’ मंत्र घेऊन वाटचाल करत स्थानिक अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याच्या दिशेने पुढे जातो आहे, त्यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या प्रगतीशील नेतृत्वाखाली, ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात झाली आहे. त्यांचे पूर्वसूरी आणि आदर्श कर्मयोगी दिवंगत श्री मनोहर पर्रीकर यांचा  समृद्ध वारसा ते खऱ्या अर्थाने पुढे नेत आहेत.

16     गोवा राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात औद्योगिक क्षेत्राच्या योगदानाची टक्केवारी आज भारतात सर्वाधिक आहे. राज्य आकाराने छोटे असतांनाही इथे मोठ-मोठ्या उद्योगांनी  गुंतवणूक केली जात आहे. गोवा राज्य उच्च दर्जाच्या औषधनिर्माण उत्पादनांसाठी ओळखले जाते.कोविड-19  महामारीविरोधातल्या लढ्यात इथल्या औषधनिर्मिती  कंपन्यांनी देशविदेशात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

17     राज्य सरकार द्वारे पुरस्कृत आरोग्य विमा योजना आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या भक्कम पायाभूत सुविधांमुळेच कोविड महामारीच्या काळात गोव्याचे सरकार सक्षमपणे लोकांची काळजी घेऊ शकले.

18     शिक्षण क्षेत्रातही गोव्याने उत्तम प्रगती केली आहे. एनआयटी आणि आयआयटी सह इथे आठ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. इथले प्रतिभावंत युवक आणि इंटरनेट सेवांचा विस्तार बघता, गोवा आता इन्फोटेक कंपन्यांच्या विकासाचे केंद्र बनण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत  आहे.

19     आपले स्वच्छ पर्यावरण, दळणवळणाच्या सुलभ सेवा आणि विपुल नैसर्गिक सौंदर्य यांच्या बळावर आज गोवा, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. 2004 पासून इथे दरवर्षी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन होत आहे. मोपा इथे प्रस्तावित असलेले विमानतळ पूर्ण झाल्यावर इथल्या पर्यटनात आणखी वाढ होईल.

बंधू आणि भगिनींनो ,

20     19 डिसेंबर 1961 हा दिवस गोवा आणि भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेला आहे. हा प्रसंग अविस्मरणीय ठरावा यासाठी गोवा सरकारने केलेले विशेष प्रयत्न कौतुकास्पद आहेत. पुढचे वर्षभर चालणाऱ्या या समारंभांसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा !! गोव्याच्या उत्साही आणि उत्सवप्रेमी नागरिकांना पुन्हा एकदा शुभेच्छा !!

धन्यवाद !

जयहिंद !