गोवा सुरक्षा मंचने जाहीर केले उमेदवार

0
727
 
गोवा खबर:निवडणूक आयोगाने रविवारी लोकसभा निवडणुकां बरोबरच गोव्यातील विधासभेच्या 3 पोटनिवडणुका जाहीर करताच राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे.आरएसएसचे बंडखोर सुभाष वेलिंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या गोवा सुरक्षा मंचने शिरोडा आणि मांद्रे मतदार संघातील आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच आम आदमी पक्षाने लोकसभेचे दोन्ही उमेदवार जाहीर केले आहेत.दक्षिण गोव्यातून पक्षाचे गोवा प्रमुख एल्वीस गोम्स तर उत्तर गोव्यातून पक्षाचे सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांनी प्रचराचे काम देखील सुरु केले आहे.
काल सायंकाळी निवडणूक आचारसंहिता लागू होताच सगळ्या पक्षांची पोस्टर्स आणि होर्डिंग्ज हटवण्यास सुरुवात झाली.आम आदमी पक्ष सोडता इतर कुठल्या पक्षाची मोठी होर्डिंग्ज राज्यात लागलेली नव्हती.गोम्स यांची मोठी होर्डिंग्ज दक्षिण गोव्यात मुख्य रस्त्याच्या शेजारी लागलेली पहायला मिळत होती.काल निवडणूक आयोगाची आचारसंहिता सुरु होताच ही होर्डिंग्ज आणि फलक हटवण्यात आली.गोम्स  यांनी फेसबुक वरुन आपलीच होर्डिंग्ज तातडीने हटवण्यात आल्या बद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
गोवा सुरक्षा मंचने देखील वेळ न दवडता आज मांद्रे आणि शिरोडा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले.गोवा सुरक्षा मंचतर्फे मांद्रे मतदार संघातुन स्वरूप नाईक तर शिरोडामधून संतोष सतरकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
म्हापसा मतदारसंघाचा उमेदवार 17 एप्रिल रोजी तर लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी 19 एप्रिल रोजी उमेदवार जाहीर केले जाणार असल्याची माहीती पक्ष प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी आज दिली.
भाजप तर्फे शिरोडा पोटनिवडणुकीत सुभाष शिरोडकर तर मांद्रे मधून दयानंद सोपटे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे.लोकसभेसाठी देखील उत्तर गोव्यातुन आयुष मंत्री श्रीपाद नाईक तर दक्षिण गोव्यातून विद्यमान खासदार नरेंद्र सावईकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.म्हापशा मध्ये पोटनिवडणूकीसाठी 5 जण इच्छुक असल्याने तेथील उमेदवार भाजपला ठरवावा लागणार आहे.फ्रांसिस डिसोझा यांच्या मुलाने देखील निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवल्याने भाजपला म्हापशाच्या उमेदवारीचा प्रश्न सगळ्यांना विश्वासात घेऊन निकाली काढावा लागणार आहे.
काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.सध्या प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर हे उत्तर गोव्यातून तर माजी मुख्यमंत्री फ्रांसिस सार्दिन हे दक्षिण गोव्यातून आघाडीवर आहेत.दक्षिण गोव्यातून महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हों या देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
गोवा फॉरवर्ड पक्ष हा भाजप आघाडीत असल्याने तो पोटनिवडणुकीत आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देणार असे संकेत मिळत आहेत.
मगो पक्षाने मात्र भाजप आघाडीचा भाग असून देखील शिरोडा पोटनिवडणूक लढवण्याची जोरदार तयारी चालवल्यामुळे भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजु लागली आहे.मगोचे पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर शिरोडा पोटनिवडणुक लढवण्याचे ठरवून प्रचार सुरु केल्याने भाजपची चिंता वाढली आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती ठीक नसल्याचा फटका भाजपला नक्की बसणार आहे.पर्रिकर पूर्वी पेडणे पासून काणकोण पिंजुन काढत होते त्यामुळे भाजपला फायदा होत होता.पर्रिकर यांच्या व्यतिरिक्त राज्यभर प्रभाव असलेला नेता भजापकडे नसल्याने भाजप प्रचाराची धुरा कोणाकड़े सोपवणार हा औत्सुक्याचा भाग ठरणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्च अखेरीस गोव्यात येऊन प्रचार सभा घेणार आहेत.ती सभा भाजपसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
देशात भाजप बरोबर युती झाल्यानंतर गोव्यातील शिवसेना थंडावली आहे.मांद्रे मतदार संघातून पोटनिवडणुक लढवण्यासाठी शिवसेनेने घरोघरी प्रचार सुरु केला होता.मात्र युतीची घोषणा झाल्या नंतर शिवसेना थंड पडली आहे.