गोवा शिवसेनेत बंडखोरी,22 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

0
871

गोवा:गोवा शिवसेनेचे प्रभारी खासदार संजय राऊत यांनी अतिरिक्त राज्य प्रमुखपदी जितेश कामत यांची निवड केल्यानंतर गोवा शिवसेने मधील अंतर्गत वाद उफाळून आले.काल रात्री पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी यांची हकालपट्टी केल्याचे पडसाद आज उमटले. जोशी यांच्या समर्थनार्थ 8 तालुका प्रमुखांसह 22 पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा सामुहिक राजीनामा दिल्यामुळे गोवा शिवसेनेला खिंडार पडले आहे.नूतन राज्यप्रमुख कामत यांनी मात्र या राजिनाम्याचा फारसा परिणाम होणार नसुन उपराज्यप्रमुख राखी नाईक यांच्यावर केलेल्या आरोपाची गंभीर दखल घेऊन जोशी गटावर मानहानी खटला दाखल केला जाणार असल्याने हे प्रकरण आणखी रंगणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पक्षासाठी पुरेसा वेळ न देणे आणि पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत जोशी यांची हकालपट्टी केल्यानंतर 22 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजिनामे देत जोशी यांचे समर्थन केले आहे.नूतन राज्यप्रमुख कामत यांना पदावरुन हटवून एकच राज्यप्रमुख ठेवावा आणि उपराज्यप्रमुख तथा प्रवक्त्या राखी नाईक यांची पक्षातुन हकालपट्टी करणे अशी मागणी जोशी गटाने केली आहे.
कामत यांनी जोशी गटाने नाईक यांच्यावर केलेले आरोप निंदनीय असल्याचे सांगत जोशी पक्षाला वेळ देऊ शकत नव्हते,त्यांच्या आर्थिक संस्थेत घोटाळा झाला असल्याने त्यांची प्रतिमा मलिन झाल्याने दुसरा राज्यप्रमुख नेमणे पक्षाला भाग पडल्याचे कामत यांनी स्पष्ट केले.नाईक यांनी जोशी यांच्या संस्थे मधील आर्थिक घोटाळ्याची आणि त्यांनी कोल्हापुर मध्ये सुरु केलेल्या यात्री निवासची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना लढवणार आहे.या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या महिन्यात गोव्यात येणार आहे.त्यापूर्वी गोवा प्रभारी संजय राऊत पक्षाची विस्कटलेली घड़ी कशी बसवतात याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.