गोवा विमानतळाने जारी केलेल्या फोटोंमुळे गोवा सरकारचा खोटारडेपणा उघड : अमरनाथ पणजीकर

0
1101
 गोवा खबर: गोवा विमानतळाने आज जारी केलेल्या चार पैकी दोन फोटो मधून गोवा सरकारच्या कोरोनाचा सामना करण्याच्या एकंदर तयारीचा भांडाफोड झाला आहे. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे दावे जमिनदोस्त झाले आहेत. गोवा सरकार औषधे व उपकरणांची वाहतुक करण्यासाठी रुग्णवाहीकेचा वापर करते हे या घटनेने उघड झाले आहे व ते अत्यंत दुर्देवी आहे,अशी टिका प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

पणजीकर म्हणाले,काॅंग्रेस पक्ष अगदी सुरवातीपासुन सरकारच्या कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारने उचललेली पाऊले व एकंदर तयारी बद्दल शंका उपस्थित करत आला आहे. मुख्यमंत्री  इतर सहकारी मंत्री आमच्या प्रश्नाना नेहमीच बगल देत, परस्पर विरोधी विधाने करुन मुद्दाम गोंधळ निर्माण करीत होते. सरकारने कोरोनाच्या एकंदर तपासणी केलेल्या रुग्णांची आकडेवारी मध्येही तफावत आहे. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री परस्पर विरोधी विधाने करुन गोंधळात अधिकच भर घालत आहेत. जनतेचा भाजप सरकारवरचा विश्वास पुर्णपणे उडाला आहे.
मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर अवघ्या काही मिनीटांत आरोग्यमंत्री प्रसारमाध्यमांना काही महत्वाची माहिती व आकडेवारी देतात. पत्रकार परिषद असुनही त्याची माहिती मुख्यमंत्र्याना नसते. डाॅ. प्रमोद सावंत व विश्वजीत राणे यांच्यातल्या शीतयुद्धाचा तो परिणाम आहे,याकडे पणजीकर यांनी लक्ष वेधले.
आज गोवा विमानतळाच्या ट्विटरवरुन गोव्यात खास विमानातुन कोविड चाचणी सामग्री आणल्याची माहिती देण्यात आली व त्यासोबत चार फोटो जोडण्यात आले आहेत. यातील दोन फोटोमध्ये चक्क रुग्णवाहीकेचा वापर मालवाहतुक करण्यासाठी केल्याचे दिसत आहे,असे सांगून पणजीकर म्हणतात, आज कोरोना संकट समोर असताना, रुग्णाना नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रुग्ण वाहिकेत सामानाची ने-आण करुन सरकार लोकांच्या जीवाशीच खेळत आहे हे सिद्ध झाले आहे.
 राज्यपालानी त्वरित प्रशासनाचा ताबा आपणांकडे घ्यावा व पंधरा लाख गोमंतकीयांच्या जीवाशी मांडलेला भाजप सरकारचा खेळ थांबवावा,अशी मागणी पणजीकर यांनी केली आहे.