गोवा विद्यापीठ भरतीसाठी रहिवाशी दाखल्याची सक्ती करावी:गोवा युवा फॉरवर्डची राज्यपालांकडे मागणी

0
649
गोवा खबर:गोवा विद्यापीठातील रिक्‍त पदे भरण्यासाठी १५ वर्षाच्या रहिवाशी दाखल्याची सक्‍ती करावी, अशी मागणी गोवा युवा फॉरवर्डच्या शिष्टमंडळाने गोवा विद्यापीठाच्या कुलपती तथा  राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्याकडे केली आहे.
गोमंतकीयांची या पदांवर  नियुक्‍ती  होऊ नये यासाठी मुद्यामहून १५ वर्षाचा रहिवाशी दाखला सादर करण्याचा नियम डावलण्यात आला असल्याचा आरोप शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत, युवा फॉरवर्डचे अध्यक्ष राज मळीक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल डॉ. सिन्हा यांची दोनापावला येथील राजभवन येथे भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्या समोर मांडल्या.
गोवा विद्यापीठातील ८२ रिक्‍त पदे भरण्यासाठी काही दिवसांपूर्वी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र या जाहिरातीत इच्छुक उमेदवारांकडून १५ वर्षाचा रहिवाशी दाखला मागण्यात आलेला नाही. प्रत्यक्षात सरकारी नोकरीसाठी  १५ वर्षाचा रहिवाशी दाखला सक्‍तीचा आहे. मात्र गोवा विद्यापीठाकडून हा नियम डावलण्यात आला. त्यामुळे या जागांवर परप्रांतीय उमेदवार देखील अर्ज करण्याची शक्यता असल्याची चिंता यावेळी शिष्टमंडळाकडून या निवेदनात व्यक्‍त केली आहे.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी देखील या प्रकारा बद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून स्थानीकांच्या बाजूने आवाज उठवणार असल्याचे स्पष्ट केले होते.