गोवा राज्यदिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्र्याच्या हस्ते सौर ऊर्जा आधारित दुर्गम ग्राम विद्युतीकरण प्रकल्पाचा शुभारंभ

0
91
गोवा खबर : सर्वांसाठी स्वच्छ, परवडणाऱ्या दरात आणि शाश्वत वीज पुरवठा करण्याचा उद्देश केंद्रस्थानी ठेवत गोव्याचे मुख्यमंत्री माननीय डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील दुर्गम ग्रामीण घरांसाठी सौर ऊर्जा आधारित विद्युतीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केले. कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड (सीईएसएल) आणि गोवा ऊर्जा विकास यंत्रणा (जीईडीए) यांच्या मध्ये यासंबंधीच्या सहकार्य करारावर स्वाक्षरी होताच दोन दिवसांमध्ये या सौर पीव्ही आधारित गृह विद्युत प्रणाली उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे ग्रिड जोडणी उभारणे व्यावहारिक नाही अशा दुर्गम प्रदेशात वीज निर्मिती व पुरवठा करणे शक्य होणार आहे.
प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “गोवा राज्यातील सर्व घरांना १०० टक्के वीजपुरवठा आणि तोही स्वच्छ पर्यावरणप्रिय वीज पुरवठा करणे आता शक्य होईल असा विश्वास आज गोवा राज्यदिनानिमित्ताने व्यक्त करण्याचा हा क्षण मोठा अभिमानास्पद आहे. जलद आणि नियोजित पद्धतीने गोवा राज्यास हरित राज्य बनवण्यासाठी आम्ही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. या प्रकल्पाशी निगडित चांगली कामगिरी करणाऱ्या जीईडीए आणि सीईएसएल यांचे मी अभिनंदन करतो.”
गोवा राज्यासाठी हरित ऊर्जा धोरण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावलेले ऊर्जा मंत्री माननीय श्री. नीलेश काब्राल म्हणाले, “राज्यातील प्रत्येक घराला हरित व स्वच्छ वीज पुरवठा करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. गोवा राज्य स्थापनेच्या दिनी या दूरगामी परिणामकारक ठरेल अशा उपक्रमाचे उद्घाटन करताना मोठा आनंद होत आहे. राज्यातील दुर्गम भागातील, कच्च्या घरांनाही ऑफ-ग्रिड पद्धतीने सौर ऊर्जेपासून बनवलेली वीज पुरवण्यात महत्वपूर्ण अशा या प्रकल्पावर जीईडीए आणि सीईएसएल एकत्रितपणे काम करत आहेत.”
राज्याचे मुख्य सचिव आणि जीईडीएचे चेअरमन परिमल राय म्हणाले, “सौरऊर्जा आधारित या प्रकल्पाचा राज्यातील दुर्गम भागातील ग्रामीण जनतेला मोठा लाभ मिळणार आहे. राज्यांच्या अशा प्रयत्नांतून केंद्राच्या पर्यावरणीय उद्दिष्टे गाठण्यासाठी गती मिळेल आणि त्यासाठी गोवा राज्याने आपल्या धोरणातून महत्त्वाकांक्षी पावले टाकण्यास सुरवात केली आहे. दुर्गम भागापर्यंत शासनाच्या अशा सुविधा पोचल्याने समजात पर्यावरणप्रिय विचारास बळकटी मिळेल आणि हवामानबदलाचे परिणाम कमी करण्यास मदत होईल.”
गोवा राज्याचे ऊर्जा सचिव कुणाल म्हणाले, “सौर ऊर्जा प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण सुधारेल आणि सर्वसमावेशक स्थानिक विकासाला गती मिळेल. स्वस्त व सौर ऊर्जेपासून बनवलेल्या विजेचा गोव्यातील गावांना मोठा लाभ होईल. गोव्यातील ऊर्जा क्षेत्राचा कायापालट करणे, ग्रामीण विकास करणे यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. आगामी काळात ग्रामीण भागातील ऑफ-ग्रिड सौर ऊर्जेची मागणी वाढत जाईल आणि त्याद्वारे या सेवेतही सुधारणा होण्यास चालना मिळत राहील.”
या प्रकल्पाबाबत सीईएसएलच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीमती महुआ आचार्य म्हणाल्या, “गोवा राज्य निर्मिती दिनाचे औचित्य साधत या प्रकल्पास सुरवात होणे ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. गोवा शासनासमवेत काम करणाऱ्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपले नेतृत्व, ध्यास दाखवला आहे आणि १०० टक्के वीजजोडणी करण्यासाठी सर्व काही करण्याची जिद्द बाळगण्याबाबतची या सरकारची भूमिका कौतुकास्पद आहे. समाजातील सर्वच घटकांच्या विकासासाठी वीज व ऊर्जा सुविधांची उपलब्धता ही पायाभूत गरज राहते आणि हीच गरज पूर्ण करण्याच्या कामी आपले योगदान देता येत असल्याबाबत आम्हाला आनंद आहे.”
नवीनीकरणीय व नूतनीकरणीय ऊर्जा विभागाचे संचालक अलेक्स डा कोस्ता म्हणाले, “सौर ऊर्जा अवलंबामध्ये घेतलेली आघाडी आणि कमी खर्चात सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता या बाबी भारतासाठी प्रोत्साहनकारक ठरत अशून ऑफ-ग्रिड प्रदेशामध्येही वीज पुरवठा करण्यास सक्षम बनवत आहेत. या प्रयत्नांमुळे सर्वांसाठी वीज उपलब्धता करणे शक्य होईल, मनुष्यबळ विकासाला चालना मिळेल, तळागाळातील जीवनमान उंचावण्यास मदत होईल आणि आर्थिक विकासाच्या नवनीन संधी जनतेला उपलब्ध होत राहतील.”
जीईडीएचे सदस्य-सचिव संजीव जोगळेकर म्हणाले, “हल्लीच आम्ही करारावर स्वाक्षरी केली आणि तातडीने सीईएसएलने आपले काम सुरू केल्याचा आनंद आहे. पर्यावरण संवर्धन आणि नवीनीकरणीय ऊर्जानिर्मितीबाबतची उद्दिष्टे साध्य करण्यास या सौर ऊर्जा प्रकल्पाचा हातभार लागणार आहे.”
सीईएसएलचा हा पहिला ऑफ-ग्रिड वीज निर्मिती व पुरवठा प्रकल्प असून गोवा राज्य शासनाच्या दुर्गम ग्राम विद्युतीकरण (आरव्हीई) प्रकल्पाच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांसाठी सौर पीव्ही सिस्टिमची उभारणी व देखभाल करण्याची जबाबदारी पेलावी लागणार आहे. ग्रामपंचायतींच्या सहकार्याने राज्यातील सर्व दुर्गम गावे, वाडी-वस्त्यांप्रर्यंत या प्रकल्पाचे लाभ पोचवण्याचा प्रयत्न सीईएसएलचा राहणार आहे.