गोवा मेडिकल कॉलेज आणि वास्को स्पोर्ट्स क्लब यांच्यातर्फे जागतिक हृदय दिनानिमित्त रनचे आयोजन 

0
952

 

 

गोवा खबर: गोवा मेडिकलकॉलेज (गोमेकॉ) येथील सेंटर फॉर कार्डिव्हॅस्कुलर अँड थोरॅसिस सायन्सेस यांनी वास्को स्पोर्ट्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिनानिमित्त रनचे आयोजन केले होते. रविवारी 29 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या या रनमध्ये 550 पेक्षा अधिक धावपट्टूनी आपला सहभाग नोंदवला. 

सहभागींमध्ये गोमेकॉमध्ये हृदय विकारांशी निगडित शस्त्रक्रिया झालेले तसेच उपचार सुरू असणारे अनेक हृदय रुग्ण उपस्थित होते. गोमेकॉचे डीन आणि डॉक्टरांनीसुद्धा या रनमध्ये आपला सहभाग नोंदवला.

धावल्यामुळे शरीर निरोगी राहत असल्याचे शास्त्रीय कारण जगाने मान्य केले असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकाच्या माध्यमातून दिलो. रविवारी झालेल्या रनसाठी ‘माझे हृदय तुमच्यासाठी, आपल्या सर्वांसाठी’ ही संकल्पना होती.

रनची सुरवात पणजीतील कला अकादमीपासून झाली. हा रन 3 किमी, 5 किमी आणि 10 किमी अशा तीन टप्प्यात पार पडला. सहभागींना मेडल, प्रमाणपत्र आणि रन संपल्यानंतर अल्पोपहार देण्यात आला.

गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या होत्या. तसेच राज्य आरोग्य सचिव नीला मोहनन यांची उपस्थितीसुद्धा लक्षणीय होती.

पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, गोवा रिव्हर मॅरेथॉन 17 नोव्हेंबर रोजी दक्षिण गोव्यातील चिखली येथे होणार आहे. ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी www.goarivermarathon.com येथे आपल्या नावाची नोंद करावी.