गोवा मुक्तीदिनापूर्वी ‘हातकातरो खांबा’च्या जर्जर चौथर्‍याची डागडूजी करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू ! – राष्ट्रप्रेमी नागरिकांची चेतावणी

0
905
डावीकडून श्री. भाई पंडित, श्री. शैलेंद्र वेलिंगकर, श्री. जयेश थळी आणि श्री. राज बोरकर
पणजी – वाहनाने धडक दिल्यानंतर जर्जर अवस्थेत असलेल्या हातकातरो खांबाच्या चौथर्‍याला एक वर्ष पूर्ण झाले तरीही दुरुस्तीकडे शासनाने  दुर्लक्ष केले आहे. अजून अपघात झाल्यास हे स्मारक नामशेष होण्याची भीती आहे. आपल्या  पूर्वजांच्या बलिदानाच्या या प्रतिकाची येत्या गोवा मुक्तीदिनापूर्वी डागडुजी न केल्यास आंदोलन उभारण्यात येईल, अशी चेतावणी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत (भाई) पंडित, संस्कृती रक्षा दल समितीचे  शैलेंद्र वेलिंगकर, हिंदु जनजागृती समितीचे जयेश थळी आणि चिंबल येथील राष्ट्रप्रेमी नागरिक  राज बोरकर उपस्थित होते.
शासनाने या खांबाकडे दुर्लक्ष करून या खांबाच्या दुरुस्ती करण्याची वेळ राष्ट्रप्रेमींवर आणू नये, अशी विनंती या वेळी करण्यात आली.वेलिंगकर म्हणाले, ‘‘प्रसिद्ध लेखक अ.का. प्रियोळकर यांच्या ‘इन्क्विझिशन इन् गोवा’ या ग्रंथात या ‘हातकातरो खांबा’च्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी स्पष्टपणे उल्लेख आहे. बाटाबाटीच्या (इन्क्विझिनच्या) वेळी गोमंतकातील हिंदू लोकांचे हात कलम होत असतानाचा हा खांब महत्त्वाचा साक्षीदार आहे. या हाताकातरो खांबाची डागडुजी करणे हे शासनाने प्रथम कर्तव्य आहे. तसे न करणे हे गोमंतकातील स्वातंत्र्यलढ्याचे आणि स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान आहे आणि हा अवमान स्वाभिमानी गोमंतकीय कधीच सहन करणार नाहीत. यासाठी वेळप्रसंगी कुठल्याही तर्‍हेचा त्याग करण्याची आमची सिद्धता आहे.’’ थळी म्हणाले, ‘‘पोर्तुगिजांनी गोमंतकीय हिंदूंना छळाने बाटवले. हिंदू आणि नवख्रिस्ती यांचे हिंदु धर्माचे आचरण रोखण्यासाठी पोर्तुगिजांनी ‘इन्क्विझिशन अर्थात धर्मसमीक्षणद्वारे केलेल्या अत्याचाराची साक्ष देणारा एकमेव ‘हातकातरो खांब’ नष्ट करण्याचे कारस्थान गोमंतकात चालू आहे. ते हाणून पाडण्यसाठी उभे राहाण्यार्‍या समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचा नेहमीच सहभाग राहिल. हाताकातरो खांब राष्ट्रीय वारसा घोषित व्हावा यासाठी हिंदु जनजागती समितीच्या वतीने गेली ३ वर्षे सातत्याने राज्य आणि केंद्रीय स्तरावर पाठपुरावा केला जात आहे. वर्ष २००६ मध्ये वाहतूक विभागाला हातकातरो खांबाच्या स्थलांतराची अनुमती नाकारतांना पुरातत्व विभागाने म्हटले होते की, ‘हा खांब इन्क्विझिशनच्या काळातील एकमेव महत्त्वपूर्ण साक्षीदार अन् पुरातन ठेवा आहे.’; मात्र तोच पुरातत्व विभाग आता अशा महत्त्वाच्या ठेव्याकडे दुर्लक्ष का करत आहे? गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, मंत्री फ्रान्सिस डिसोझा, जयेश साळगावकर, उपजिल्हाधिकारी आदी अनेक नेत्यांकडे गेल्या वर्षभरात हा विषय समितीच्या वतीने पोहोचवण्यात आलेला आहे. शासन जुने गोवे परिसरासाठी साधनसुविधायुक्त ‘वारसा मास्टर प्लॅन’ तयार करत आहे आणि यामध्ये ‘प्लॅन’मध्ये जुने गोवे येथील ऐतिहासिक ‘हातकातरो खांबा’चा समावेश केला आहे का?.’’   पंडित म्हणाले, ‘‘गोवा शासन अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यास मागेपुढे पहात नाही; मात्र राष्ट्रीय खांबाकडे दुर्लक्ष करते. जूने गोवे शहरात फेस्त भरवण्यासाठी साधनसुविधांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च करणारे शासन याच शहरात असलेल्या हातकातरो खांबाकडे का दुर्लक्ष करत आहे?’’