गोवा-मुंबई फेरीबोट सेवा येत्या डिसेंबरमध्ये सुरू होणार- नितीन गडकरी

0
928

सागरमाला प्रकल्पांतर्गत एक कोटी रोजगारनिर्मिती होणार

पणजी:गोवा ते मुंबई फेरीबोट सेवा येत्या डिसेंबरमध्ये सुरु होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, नौकानयन, जलस्त्रोत आणि गंगा विकास खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिल्ली. केंद्रीय नौकानयन मंत्रालयांतर्गत प्रमुख बंदरांच्या कामगिरीसंदर्भातील आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला प्रमुख 12 बंदरांचे प्रतिनिधी, कोचीन शिपयार्ड लिमिटेड, शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया,  ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, यासह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सागरमाला हा केंद्र सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे देशभरात एक कोटी रोजगारनिर्मिती होईल, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. सागरमाला अंतर्गत एकूण 289 प्रकल्पांचे काम विविध पातळीवर सुरू आहे. त्यासाठी सरकारने 2.17 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच नव्या 46 प्रकल्पांसाठी सागरमाला अर्थसंकल्प (2017-18) अंतर्गत 601 कोटी रुपयांचे हस्तांतरण केले आहे.

 

नौकानयन मंत्रालयाने आयआयटी चेन्नईची सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून निवड केली आहे. चेन्नई आयआयटी नौकानयन मंत्रालयाला खोदकाम आवश्यकता आणि खर्च कमी करण्यासाठी अहवाल तयार करेल.

 

बंदरांच्या आधुनिकीकरणासाठी 234 प्रकल्पांची निवड करण्यात आली असून त्यासाठीचा आराखडाही तयार आहे. तसेच प्रमुख 12 बंदरांचा विकास आणि बंदर क्षमता विकासासाठी 142 प्रकल्प मार्गावर आहेत. वाधवन (महाराष्ट्र), इनायेम (तामिळनाडू), सागर द्वीप (पश्चिम बंगाल) पाराद्वीप (ओडिशा), सिरकाझी (तामिळनाडू), बेलेकेरी (कर्नाटक) यांचा नवीन बंदर म्हणून विकास करण्यात येणार आहे. रेल्वे-बंदर जोडणीसाठी 42, 703 कोटी रुपयांचे 33 प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे.