गोवा माइल्सच्या पाठीशी सरकार ठामपणे राहणार:सोपटे

0
1680
गोवा खबर: गोवा सरकारने राज्यातील पर्यटनाच्या हिताचा विचार करत गोवा माइल्स उपक्रमाच्या पाठीशी उभे राहाण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही उपद्रवी शक्तींच्या दबावापुढे झुकून ही अॅप आधारित टॅक्सी सेवा बंद किंवा खंडित करण्याच्या मागणीचा विचार केला जाणार नाही.’असे आज गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांनी गोवा माइल्सच्या विरोधकांना ठणकावून सांगितले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत गोवा माइल्स या अॅप आधारित टॅक्सी सेवेला स्थानिक टॅक्सीचालकांच्या असलेल्या विरोधाबद्दल चर्चा झाली होती.त्यांतर आज गोवा पर्यटन विकास महामंडळाचे  अध्यक्ष  सोपटे यांनीही सरकार गोवा माइल्सच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सोपटे म्हणाले, ‘गोवा माइल्समध्ये अद्याप सहभागी न झालेल्या स्थानिक टॅक्सी चालकांना आम्ही आवाहन करतो, की त्यांनी येत्या ऑगस्टमध्ये आपल्या कार्यकाळाचे एक वर्ष पूर्ण करणाऱ्या गोवामाइल्सच्या विरोधात उभे राहाण्याऐवजी व त्याला विरोध करण्याऐवजी त्यामध्ये सहभागी व्हावे.’
सोपटे म्हणाले, ‘आज काही टॅक्सीचालक केवळ अज्ञान आणि मत्सरापोटी गोवा माइल्सवर बिनबुडाचे आरोप करत आहेत, कारण त्यांचे काही सहकारी गोवा माइल्समध्ये सहभागी होऊन चांगली प्रगती करत आहेत. विरोधकांची ही कृती निव्वळ स्वार्थी असून ते इतरांना आपले हित साधण्यापासून रोखत असल्याचे दिसत आहे.’
गोवा माइल्सची संपूर्ण यशोगाथा तिच्या स्थापनेपासून विस्ताराने समजावत  सोपटे म्हणाले, ‘जीटीडीसीने जानेवारी 2018 मध्ये निविदा काढल्यानंतर गोवा माइल्सची संकल्पना प्रत्यक्षात आली. त्यासाठी त्यांतर मुंबईस्थित अनुभवी कंपनीला हे कंत्राट देण्यात आले.’
“गोयं, गोयंकर आणि गोयंकरपण यांचे हित लक्षात घेतल्याबद्दल कंपनीचे कौतुक करायला हवे. निविदेच्या अटींचा एक भाग म्हणून कंपनीने फ्रोटामाइल्स ही स्पेशल पर्पज व्हेइकल कंपनी सुरू करून त्याला गोवा माइल्स हे नाव आणि स्टाइल अंतर्गत नवी अप आधारित टॅक्सी सेवा लाँच केली,” याकडे सोपटे यांनी लक्ष वेधले. गेल्या वर्षभरातील गोवामाइल्सच्या कामगिरीबद्दल बोलताना सोपटे म्हणाले ‘ऑगस्ट 2018 मध्ये सेवा सुरू झाली त्यावेळी   55 टॅक्सी त्यात सहभागी झाल्या होत्या.आता त्यात वाढ होऊन हा आकडा  1400 वर गेला आहे. ऑगस्ट 2018 मध्ये 1500 फेऱ्यांसह सुरू झालेल्या या अॅप आधारित टॅक्सी सेवेने डिसेंबर 2018 मध्ये 14 हजार फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. जून 2019 मध्ये 20 हजार पेक्षा जास्त फेऱ्या नोंदवल्या आहेत. त्यातून एकूण 70 लाख रुपयांचे करउत्पन्न सरकारला मिळाले आहे, जे यापूर्वी मिळत नव्हते. गोवा माइल्समध्ये 45 गोमंतकीय तरुणांना वेगवेगळ्या पदांवर रोजगार मिळालेला आहे.’
“ गोवामाइल्सकडे नोंदणी केलेला एक टॅक्सी चालक दिवसाला 3500 रुपयांची कमाई करतो व त्यात देशभरातील इतर अॅप आधारित टॅक्सी सेवांप्रमाणे कमिशनचाही समावेश नसतो,” असे सांगून सोपटे म्हणाले, ही कमाई गोवा माइल्सकडे नोंदणी न केलेला चालक दिवसभरात कमावतो त्यापेक्षा बराच जास्त आहे. चालक जितकी मेहनत करेल तितके जास्त उत्पन्न मिळवण्याची संधी गोवामाइल्स देते.
गोवा माइल्स ‘बाहेरचे’ नाही,असे स्पष्ट करून सोपटे म्हणाले,  ‘अप आधारित इतर टॅक्सी सेवांपेक्षाही गोवा माइल्सचे स्थानिक नाते जास्त दृढ आहे,’

गोव्यात नव्याने सुरू करण्यात आलेल्या या अॅप आधारित टॅक्सी सेवेमुळे सरकारला गुंतवणूक किंवा तंत्रज्ञान अशा कोणत्याही बाबतीत खर्च करावा लागलेला नाही आणि याचा अप्लिकेशन सर्व्हिस कोड गोवा सरकारच्या नियंत्रणाखाली आहे,असे सांगून सोपटे म्हणाले, गोवा माइल्सवर नोंदलेले चालक आणि टॅक्सी मालकही स्थानिक आणि मूळचे इथलेच नागरिक आहेत.अन्यथा त्यांना गोव्यात टॅक्सी चालवण्याचा परवाना मिळालाच नसता. त्याशिवाय गोवा माइल्सने कित्येक चालकांना रोजगार मिळवून दिला आहे. बऱ्याचदा स्थानिक टॅक्सी मालक गोव्यात रोजगाराच्या शोधात असलेल्या परप्रांतीयांना कामाला ठेवतात.

सोपटे म्हणाले, गोवा माइल्समध्ये काम करणाऱ्या प्रत्येक चालकाची पोलिस पडताळणी केली जाते. त्यांना वागण्या बोलण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे टॅक्सीसेवा जास्त अदबशीर होते व पर्यटक आणि स्त्री प्रवाशांचे त्यांना प्राधान्य मिळते. आता कायदेशीर झालेल्या आणि अधिकृत व्यवसाय करणाऱ्या अंदाजे 2500 रेंट-अ-कॅब चालकांनाही गोवा माइल्समध्ये सहभागी होऊन या सेवेअंतर्गत भरीव फायदे मिळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 जीटीडीसीद्वारे सरकार गोवा माइल्सशी संबंधित चालकांसाठी विमा, वैद्यकीय सेवा अशा विविध प्रकारच्या योजना सुरू करणार आहे.
गोवा माइल्समध्ये काम करणाऱ्या चालकांना ईडीसीद्वारे वाहन खरेदीसाठी कर्जसुविधा देण्यावरही काम सुरू असल्याची माहिती सोपटे यांनी यावेळी दिली.