गोवा बोर्डाचा दहावीचा निकाल 92.47 टक्के

0
581
गोवा खबर: गोवा बोर्डाचा शालांत  परीक्षेचा अर्थात दहावीचा निकाल ९२.४७ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे तब्बल ९८ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १00 टक्के लागला आहे. यात ६७ अनुदानित तर ३१ सरकारी माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे. 
गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यावेळी मंडळाचे सचिव भगिरथ शेट्ये, परीक्षा विभागप्रमुख ज्योत्ना सरीन उपस्थित होत्या.
यंदा १८,६८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यातील १७,२७८ उत्तीर्ण झाले. एकूण २७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या. ९२१५ मुलांनी परीक्षा दिली त्यातील ८५0६ उत्तीर्ण झाले. मुलं उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.३१ टक्के आहे. तर ९४६९ मुलींनी परीक्षा दिली. त्यातील ८७७२ उत्तीर्ण झाल्या. मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.६४ टक्के आहे.
एकूण ७१२२ विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्यात आले. काही विषयांमध्ये नापास झाल्याने उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्यक्षात २७९ जणांना या गुणांचा लाभ झाला. ही टक्केवारी १.६१ टक्के इतकी आहे.
३३ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या आणि ‘सुधारणा हवी’ असा शेरा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी १४ जूनपासून पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी २५ मे ते १ जून या कालावधीत केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. २ जूननंतर प्रत्यक्ष अर्जही स्वीकारले जाणार नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत आणि त्यांना गुणांमध्ये सुधारणा हवी असेल तर त्यांनीही ही परीक्षा देता येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.