गोवा बनले कोरोना मुक्त राज्य

0
799
गोवा खबर:7 पैकी उरलेल्या शेवटच्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा रिपोर्ट आज निगेटीव्ह आला आहे.गोव्यात आता एकही कोरोनाग्रस्त रुग्ण उरलेला नाही.त्यामुळे गोवा कोरोना मुक्त राज्य बनले असले तरी 3 मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहील,अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

गोव्यात उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे दोन जिल्हे असून यापूर्वीच दक्षिण गोवा ग्रीन झोन म्हणून जाहिर करण्यात आला आहे.आता सात पैकी शेवटच्या एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने गोवा सध्याच्या घडीला कोरोना मुक्त राज्य बनले आहे.सध्याच्या स्थितीची माहिती केंद्र सरकारला कळवण्यात आली असून त्याची पडताळणी झाल्या नंतर गोव्याला पूर्णपणे ग्रीन झोन जाहीर केले जाऊ शकते.
 सातही कोरोना रुग्णावर उपचार करून त्यांना बरे  करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी समाधान व्यक्त केले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले,एकही रुग्ण नसला तरी 3 मे पर्यंत लोकांनी लॉक डाऊनला सहकार्य करणे गरजेचे आहे.यापुढे एकही रुग्ण सापडू नये याची खबरदारी सगळ्यानी घेतली पाहिजे.खबरदारीचा उपाय म्हणून 3 मे पर्यंत गोव्याच्या सगळ्या सीमा सीलच राहणार आहेत.
बेळगाव मध्ये कोरोना रुग्णाची संख्या अचानक वाढल्याने कर्नाटकला जोडणाऱ्या दोन्ही सिमेवरील तपासणी अधिक कडक केली जाणार आहे.कोणीही गोव्यात येऊ नये याची खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
खलाशांना गोव्यात आणण्या बाबत उच्चस्तरावर पाठपुरावा केला जात आहे.केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक देखील आज दिल्ली येथे गेले असून ते देखील परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि इतर संबंधितांची भेट घेऊन विषयाला गती देणार आहेत.खलाशी गोव्यात आल्या नंतर साधारण सात ते आठ हजार खोल्या त्यांना क्वारंटाइन करण्यासाठी लागणार आहेत.त्यासाठी पडताळणी सुरु आहे.गोव्यात गरज पडल्यास सरकार 20 हजार खोल्या ताब्यात घेऊन त्या उपलब्ध करून देऊ शकत,असे मुख्यमंत्री म्हणाले.
उद्या पासून सरकारी कार्यालये आवश्यक तेवढे कर्मचारी घेऊन सुरु केली जाणार आहेत.त्यांची ने आण करण्यासाठी कदंबच्या बसेस सोडल्या जाणार आहेत.कार्यालयां मध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यासाठी नव्याने खरेदी केलेल्या थर्मल गन उपलब्ध करून दिल्या जाणार,असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नाही.सामाजिक अंतर राखून सरकारी कर्मचाऱ्यांची ने आण करताना कदंब बसेसचे दररोज निर्जंतूकीकरण केले जाणार आहे.जी कार्यालये सुरु होणार आहेत त्यांच्यासह 200 सार्वजनिक ठीकाणांचे देखील निर्जंतूकीकरण करण्यात आले आहे.