गोवा प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प करूया:मुख्यमंत्री

0
995

प्लास्टिकच्या अती वापरामुळे पर्यावरणाच्या गंभीर समस्या निर्माण होणार असल्याने प्लास्टिक मुक्त गोवा करूया असे आवाहन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज 70 व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात बोलताना केले.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात देशात शिक्षणाची गंगा तळागळात पोचवण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.देशात 5 वी पेक्षा कमी शिकलेल्याचे प्रमाण प्रचंड असून जास्तीत जास्त शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी योग्य ती पावले उचलली जाणार असल्याचे पर्रिकर यांनी स्पष्ट केले. पर्रिकर म्हणाले देशात 35 पर्यन्त वयोगटामधील युवकांची संख्या जास्त असून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सर्व पातळ्यावर प्रयत्न केले जाणार आहेत.
*ड्रग्सची पाळेमुळे खणून काढणार*
गोव्यात ड्रग्सची समस्या गंभीर बनली असून रोजगार नसल्याने नैराश्य आलेले तरुण ड्रग्सच्या आहारी जात असून पोलिसांना ड्रग्सचे जाळे उध्वस्त करण्याचे निर्देश देण्यात आले असून पर्यटना धोकादायक ठरतील असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे पर्रिकर यांनी स्पष्ट केले.
पणजी येथील जुन्या सचिवालया समोर ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पडला.पर्रिकर यांच्या हस्ते झेंडावंदन झाले.त्यानंतर त्यांनी पोलिसांची मानवंदना स्वीकारली.सोहळ्याला केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, सभापती प्रमोद सावंत,महसुल मंत्री रोहन खवंटे, वीजमंत्री पांडुरंग मडकईकर,कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक, डीजीपी मुक्तेश चंदर आदी उपस्थित होते.पर्रिकर यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिसांना पदके देऊन सन्मानित करण्यात आहे.