गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव करणार सर्व चाळिस मतदारसंघाचा दौरा

0
41
  • विधानसभा निवडणूकांसाठी कॉंग्रेसची आक्रमक रणनिती
गोवा खबर : आगामी विधानसभा निवडणूकांच्या तयारीसाठी कॉंग्रेस पक्ष आता अधिक आक्रमक होणार असुन, आठ महिन्यानंतर येणाऱ्या निवडणूकांच्या तयारीसाठी कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव हे येत्या आठवड्यात सर्व चाळीस मतदारसंघाचा दौरा करुन गट समित्यांचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्यानंतर कॉंग्रेस पक्षात आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत.
कॉंग्रेस प्रभारी दिनेश राव यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी करण्यासाठी गठन केलेल्या समन्वय समितीची व्हिडीयो कॉन्फरंसद्वारे बैठक झाली. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत, समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. रमाकांत खलप, जोड-अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेंसो, दक्षिण गोवा खासदार फ्रांसिस सार्दिन, आलेक्स सिक्वेरा तसेच इतर सदस्यांनी बैठकीत भाग घेतला.
कॉंग्रेसचे सदस्य नोंदणी राज्य निरीक्षक प्रकाश राठोड, उत्तर गोवा निरीक्षक मंसुर खान, दक्षिण गोवा निरीक्षक सुनिल हनुमन्नवार यांनी ही बैठकीत भाग घेवुन विचार मांडले.
कॉंग्रेस प्रभारी दिनेश राव यांनी सर्व आमदार, खासदार तसेच प्रदेश कॉंग्रेस समिती सदस्यांना आता मैदानात उतरुन लोकांकडे थेट संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत. सर्व चाळीस मतदारसंघातील गट समितींचा आढावा घेतल्यानंतर, कॉंग्रेस पक्षाच्या राज्य, जिल्हा व गट समित्यांमध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. कॉंग्रेसच्या सर्व सदस्यांच्या मागील कामगीरीचा आढावा घेतला जाणार असुन, पक्षासाठी योग्य योगदान दिलेल्यांना बढती देण्यात येणार आहे. काही कारणांमुळे पक्ष कार्यात जास्त वेळ देवु न शकणाऱ्यांना पक्षाची इतर जबाबदारी देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दोन्ही जिल्हा समित्या व जोड-संघटनांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार असुन, गरज भासल्यास तेथेही आवश्यक बदल करण्यात येणार आहेत अशी माहिती दिनेश राव यांनी दिली.
आजच्या बैठकीत गोवा मुक्तिदिनी कार्यक्रम आयोजित करण्यावरही चर्चा करण्यात आली. अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षातर्फे ११ जून रोजी इंधन दरवाडी विरुद्ध देशव्यापी आंदोलन करण्यात येणार असुन, गोव्यातही सर्व चाळीस मतदारसंघात धरणे व निषेध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे व त्यात पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.