गोवा टपाल विभागाने प्रकाशित केली पिक्चर पोस्टकार्ड

0
755

गोवा खबर:“जागतिक निसर्ग संवर्धन दिन २०२०”च्या पूर्वसंध्येला ‘एव्हियन डायव्हर्सिटी ऑफ गोवा’- सिरीज-१ वर आधारित पिक्चर पोस्टकार्डचा एक पॅक, संतोष कुमार, आयएफएस, अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक व मुख्य वन्यजीव वॉर्डन, गोवा वन विभाग, पणजी, तसेच डॉ. एन. विनोदकुमार, पोस्टमास्टर जनरल, गोवा विभाग, यांच्या हस्ते २८ जुलै २०२० रोजी प्रकाशित करण्यात आला.

गोवा टपाल कार्यालयाचे वरिष्ठ अधिक्षक सुधीर गोपाल जाखरे यांनी माहिती दिली की, पर्यावरणीय जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी संसाधनांचा शाश्वत उपयोग व पक्ष्यांचे महत्त्व, यावर प्रकाश टाकण्यासाठी ही पिक्चर पोस्ट कार्डे प्रसिद्ध केली आहेत.

डॉ एन. विनोदकुमार यांनी शाश्वत इकोसिस्टम तयार करण्यासाठी मनुष्य व निसर्गाचा संघर्ष रोखण्याच्या गरजेवर भर दिला. संतोष कुमार यांनी गोव्यातील समृद्ध जैवविविधता व त्याचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने घेतलेल्या विविध योजनांवर प्रकाश टाकला. ‘गोवा फिलेटेलिक अँड न्यूमिझमॅटिक सोसायटी’चे एम. आर. रमेश कुमार यांनी जागतिक निसर्ग संवर्धन दिन 2020च्या निमित्ताने आपल्या नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल गोवा पोस्टल विभागाचे अभिनंदन केले.

ही पिक्चर पोस्ट कार्ड  दोन वेगवेगळ्या पॅकमध्ये उपलब्ध असतील, उदा. प्लेन पॅक आणि कॅन्सल्ड पॅक, प्रत्येकात १० पोस्ट कार्डे आहेत. प्लेन पॅकचा दर ₹ १५० आहे तर, कॅन्सल्ड पॅकचा दर ₹ २५० आहे. ही पोस्टकार्ड पणजी मुख्य टपाल कार्यालयाच्य फिलेटेलिक काउंटरवर 28 जुलै 2020 पासून उपलब्ध झाली आहेत.