गोवा गारठला ; पारा उतरला

0
948
गोवा खबर: उत्तर भारताच्या हिमालयाच्या रांगांमध्ये होत असलेल्या जोरदार बर्फवृष्टीचा परिणाम गोव्यात देखील जाणवू लागला आहे.आज सकाळी साडे आठ वाजता गोवा वेधशाळेने केलेल्या नोंदी नुसार पणजी येथील तापमान 15.9℃ नोंदवले गेले आहे.
उत्तर भारतात हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये झालेली जोरदार बर्फवृष्टी ,वाऱ्याने बदललेली दिशा आणि उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे गोव्याचा पारा खाली उतरला आहे.गेल्या 2 दिवसांपासून जोरदार वारे सुटले असल्याने थंडीची तीव्रता जास्त जाणवू लागली आहे.
महाराष्ट्रात महाबळेश्वर मध्ये दवबिंदू गोठले असून तापमान उणे झाले आहे.गोव्यात ग्रामीण भागात देखील पारा 15 पेक्षा जास्त खाली उतरला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
गोवा वेधशाळेच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहिती नुसार येत्या 24 तासात गोव्यातील तापमान अधिकतम 31℃ तर न्यूनतम 16℃ राहण्याची शक्यता आहे.येत्या 48 तासात तापमान अधिकतम 31℃ तर न्यूनतम 17℃ राहण्याची शक्यता आहे.