गोवामुक्तीच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित वर्षभर कार्यक्रम

0
308
गोवा खबर : गोवा मुक्तिदिनाच्या ६०व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १९ डिसेंबरपासून पुढील वर्षभर राज्यात आणि देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्ली दौऱ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गोवा मुक्ती दिन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण देखील दिले आहे.
गोव्याची संस्कृती, पर्यटन, खेळ तसेच इतिहास या कार्यक्रमांतून जगभर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही गोव्यात आमंत्रित केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतीच दिली.
मुक्तिदिनाचे वर्षभरातील कार्यक्रम निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली आहे. सध्या १९ डिसेंबर रोजी सायंकाळी आझाद मैदानावर भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ३ किंवा ४ डिसेंबर रोजी आयोजन समितीची पहिली बैठक होणार आहे. त्यानंतर करोना परिस्थिती पाहून वर्षभरातील सर्वच कार्यक्रमांचे नियोजन केले जाईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून पुढील वर्षभर गोव्यासह इतर राज्यांतही मुक्तिदिनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. राज्यात पंचायत, पालिका, तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. इतर राज्यांच्या राजधानीच्या शहरातही अशाप्रकारचे कार्यक्रम घेऊन गोव्याची संस्कृती, पर्यटन, खेळ तसेच इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ६० व्या मुक्तिदिनानिमित्त गोवा मुक्तीसाठी योगदान दिलेल्या हयात असलेल्या आणि नसलेल्या सर्वच स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केला जाणार आहे. केवळ गोव्यातीलच नव्हे, तर इतर राज्यांतील ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी मुक्तीसाठी योगदान दिलेले आहे, अशांचाही त्या-त्या राज्यांत जाऊन गौरव केला जाणार आहे.
विविध क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या ६० गोमंतकीयांचा यानिमित्ताने सन्मान करण्यात येणार आहे.
मुक्तीदिनानिमित्त जे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील, त्यातून गोमंतकीय संस्कृती आणि गोव्यात तयार होणाऱ्या विविध वस्तूंना चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गोव्यात तयार होणाऱ्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
मुक्तिदिनाच्या कार्यक्रमांसाठी शंभर कोटींपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे खास निधीचीही मागणी केली आहे. केंद्राकडून हा निधी निश्चित मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे.
यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून त्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक (सहअध्यक्ष), खासदार फ्रान्सिस सार्दिन, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, सभापती राजेश पाटणेकर, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, मनोहर आजगावकर, मंत्री जेनिफर मोन्सेरात, गोविंद गावडे, नीलेश काब्राल, माविन गुदिन्हो, मुख्य सचिव परिमल राय, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव संजय कुमार, संचालक सुधीर केरकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, प्रताससिंह राणे, माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई, चर्चिल आलेमाव, शिक्षणतज्ञ दत्ता  नाईक, पत्रकार संजय ढवळीकर, पांडुरंग कुंकळ्ळकर, ज्योकिम पिंटो, अरुण साखरदांडे, अनिल सामंत, पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीना, दोन्ही जिल्हाधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे.