‘गोवापेक्स २०१९’ मध्ये तब्बल ३३ पारितोषिके प्रदान

0
860

 

 

गोवा खबर:भारत टपाल कार्यालय, गोवा क्षेत्र आयोजित ‘गोवापेक्स २०१९’ या टपाल तिकिटांच्या प्रदर्शनाचा आज सामारोप झाला. या कार्यक्रमात टपाल तिकिटांच्या संग्रहकांना तब्बल ३३ पारितोषिके प्रदान करण्यात आली. राज्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच वारसा प्रवर्तक संजीव सरदेसाई व नामवंत घुमट वादक कांता गौडे हे देखील याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित होते.

 

पणजी मधील इन्स्टिट्यूट ऑफ मेनेझेस ब्रागांझा सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमात सुरुवातीला कांता गौडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घुमट वादन करून उपस्थितांची वाहवा मिळवली. त्यानंतर गोव्याचे पुरातन वाद्य घुमट वरील एका विशेष पृष्ठाचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमासंदर्भातील एका स्मरणिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले.

 

प्रत्येक माणूस शेवटच्या श्वासापर्यंत शिकत असतो, अशी आपल्या भाषणाची सुरुवात करताना मंत्री गोविंद गावडे यांनी उपस्थित मुलांना ध्येयाशिवाय यशप्राप्ती नाही, असा संदेश दिला. टपाल, पत्र देश, जग जोडलेले ठेवते, हे मोठे काम असल्याचे त्यांनी नमूद केले. तरुणांना सशक्त करण्यासाठी सर्व प्रकारची व्यासपीठे उपलब्ध व्हायला हवी, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

संजीव सरदेसाई यांनी टपाल विभागातील जगातील रंजक इतिहास सांगत टपाल तिकीटासारखे बना, असा विद्यार्थ्यांना संदेश दिला. टपाल तिकिटे पाकिटाच्या एका कोपऱ्यावर असूनसुद्धा जगभ्रमंती करते, त्याप्रमाणे स्वत:ला घडवा व त्याचे मूल्य जाणा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कांता गौडे यांनी घुमट आपला ४५ वर्षांपासून जीवनसाथी असल्याचे नमूद केले. या वाद्याने आपल्याला जग फिरण्याची संधी दिली, तथाकथित उच्च शिक्षित नसताना सन्मानास पात्र केले, अशी भावना गौडे यांनी व्यक्त केली. घुमटाने गोव्यातील सामाजिक सलोखा जपला आहे, अशा आपल्या राज्याचा वारसा असलेल्या वाद्याला भारतीय टपाल विभागाने विशेष स्थान दिल्याबद्दल गौडे यांनी भारत टपाल विभागाचे आभार मानले.

या प्रदर्शनामध्ये सहभागी स्पर्धकांच्या संग्रहाचे परीक्षण पुरुषोत्तम भार्गवे, नाशिक व प्रतिसाद नेऊरगांवकर, पुणे या टपाल तिकीट संग्राहकांनी केले. पारितोषिकांमध्ये तीन चषक, ८ सुवर्ण पदके, १० रौप्य पदके, तर १२ कांस्य पदकांचा समावेश आहे. (सोबत यादी जोडली आहे)

 

यावेळी उपस्थितांचे स्वागत वरिष्ठ टपाल अधीक्षक अर्चना गोपीनाथ यांनी केले, तसेच आभारप्रदर्शन पोस्ट मास्टर जनरल, गोवा क्षेत्र डॉ. एन विनोद कुमार यांनी केले.