गोमेकॉ मध्ये लवकरच दर्जेदार अन्न : विश्वजीत राणे

0
721

गोवा खबर:खाजगी रूग्णालयांप्रमाणेच सरकारतर्फे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांसाठी लवकरच पोषक व चांगले अन्न उपलब्ध केले जाणार आहे. यासारख्या उपक्रमांवर सरकारतर्फे १२ ते १४ कोटी रूपयांपेक्षाही अधिक खर्च केला जाणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री  विश्वजीत राणे यांनी दिली. सत्तरी तालुक्यातील केरी येथे प्रस्तावित पंचायत इमारतीची पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते.

या प्रस्तावित कामाचा अंदाजे खर्च रू.२,१४,७५,४४३,०० एवढा असून त्याचे बांधकाम दीनदयाळ पंचायत राज साधनसुविधा विकास (सुवर्ण महोत्सव) योजनेंतर्गत करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य श्री. फटी गांवकर, केरी ग्रामपंचायतीचे सरपंच  गोविंद गांवस, उप-सरपंच श्रीमती रूक्मिणी गांवस, गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापक  वालावलकर, प्रकल्प सल्लागार गुरूदत्त संझगिरी,  विनोद शिंदे, ग्रामपंचायत सदस्य व इतर उपस्थित होते.

राणे पुढे म्हणाले, आपण सत्तेत असताना सत्तेचा वापर केला पाहिजे, जेणेकरून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या ठिकाणाचा आपण विकास करू शकतो.

यावेळी आरोग्यमंत्र्यांनी स्थानिकांना आपल्यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. समाजाची परतफेड करण्याच्या दृष्टीने आरोग्य, सुशोभिकरण, शिक्षण, प्रशासन इ. क्षेत्रांमध्ये सामाजिक विकास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असे ते म्हणाले.

जिल्हा पंचायत सदस्य श्री. फटी गांवकर व माजी सरपंच लक्ष्मण गांवस यांचीही यावेळी  भाषणे झाली.

तत्पूर्वी सरपंच  गांवस यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.  लक्ष्मण माजिक यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

या पंचायत प्रकल्पात पंचायत, अभ्यागतांसाठी प्रतीक्षा कक्ष, दुकाने व ६०० जनक्षमतेचे बहुद्देशीय सभागृह यांचा समावेश आहे.