गोमेकॉत ऑक्सिजकांड सुरूच : आणखी 13 जणांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

0
217
गोवा खबर : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात काल (गुरुवारी) रात्री आणखी 13 कोविड रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे 2 ते 6 या वेळेत ऑक्सिजन पुरवठा अपेक्षित प्रमाणात न झाल्याने हे मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. हायकोर्टाने ताशेरे ओढूनही सरकारला गोमेकॉमधील ऑक्सिजन संकटावर मात करण्यात अपयश आले आहे.
11 मे रोजी गोमेकॉमध्ये 26 रुग्ण दगावले होते. त्यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी एका खाजगी वाहिनीशी बोलताना याप्रकरणी हायकोर्टाने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर 13 मे रोजी पुन्हा ऑक्सिजनअभावी पहाटे 2 ते 6 या वेळेत 15 कोविडग्रस्तांना आपला जीव गमवावा लागला होता. एका याचिकेची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने यावरून सरकार आणि गोमेकॉ प्रशासनावर कडक शब्दात ताशेरे ओढले होते. त्यानंतरही गोमेकॉतील ऑक्सिजकांड संपलेले नाही.
गोमेकॉमधील कोविड रुग्णांचे मृत्युसत्र थांबत नसल्याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी सकाळी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. गोमेकॉसाठी ऑक्सिजन अजूनही अपुरा पडत आहे. राज्यातील विविध इस्पितळांमध्ये रोज 60 ते 70 रुग्ण कोविडने मरण पावत आहेत. लोकांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून गेल्या 13 महिन्यात 2 हजार कोविडग्रस्तांचे बळी गेल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
गोमेकॉमध्ये शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 27 रुग्ण दगावले होते.
काँग्रेसचे केंद्रिय नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी शुक्रवारी ट्विट करत कोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली. दिवसाढवळ्या कोविडग्रस्तांचे खूनच होत असण्यासारखी गोव्यात स्थिती आहे. गोव्यातील सावंत सरकारच्या हाताला कोविडग्रस्त नागरिकांचे रक्त लागलेले आहे, असे सुरजेवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, 2 ते 6 या वेळेत गोमेकॉतील काही वॉर्डांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर संपतात, त्या वेेळेत कोविड रुग्णांना अधिक ऑक्सिजनची गरज असते. सरकारने तीन आयएएस अधिकार्‍यांना नोडल अधिकारी म्हणून नेमूनही गोमेकॉमधील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही. त्यातच गोवा साधनसुविधा विकास महामंडळाच्या कंत्राटदाराने ऑक्सिजन व्यवस्थेशी निगडित केलेली एक व्यवस्थादेखील कुचकामी ठरल्यामुळे गोव्यातील कोविड आणीबाणी अधिकच गंभीर बनली आहे.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत सरकारच्या हलगर्जीपणामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. उर्मट आणि हेकेखोर भाजप सरकारने राहुल गांधी यांच्याकडून शिकवण घ्यावी, असा सल्लाही कामत यांनी दिला आहे.