गोमंतकीय हितरक्षण हे मुख्यमंत्र्यांचे घटनात्मक कर्तव्य : आम आदमी पक्ष 

0
1143
गोवा खबर: गोवेकरांच्या हिताचे रक्षण करा. राज्याला केंद्राचा एक फारसा महत्वाचा नसलेला दुर्लक्षित विभाग बनवू नका, अशी मागणी आम आदमी पक्षाचे निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.
दिल्लीहून गोव्याच्या माथी मारण्यात आलेले प्रकल्प आंधळेपणाने स्वीकारून गोव्याला दिल्लीचा एक दुर्लक्षित प्रदेश बनवू नका, असे म्हांबरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिण्यात आलेल्या पत्रामध्ये म्हांबरे यांनी  मुख्यमंत्री या नात्याने गोव्याच्या हिताचे रक्षण करणे हे तुमचे घटनात्मक कर्तव्य आहे. त्यासाठी पक्षीय राजकारण विसरून गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नांमध्ये आपले प्रयत्न पणाला लावावे लागतील. गोव्याची स्वतंत्र ओळख टिकविण्यात मोठ्या संघर्षानंतर यश आलेले आहे, हे तुम्ही विसरता कामा नये,असे ठणकावून बजावले आहे.
 पोर्तुगीजांच्या जोखडापासून गोव्याला मुक्त करण्यासाठी गोमंतकीय शौर्याने लढले. आता गोवा ही केंद्र सरकारची खासगी वसाहत वा मालमत्ता होण्याच्या स्थितीत येऊन ठेपली असल्याने गोवेकर हे सहन करणार नाहीत, असे म्हांबरे म्हणाले.
रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाचा गोव्याला कुठलाही फायदा होणार नाहीच पण गोव्यातील लोकांच्या माथी मारण्यात आलेल्या या प्रकल्पाला केवळ कर्नाटकाला मदत करण्यासाठी पुढे दामटण्याचे प्रयत्न सुरू आहेत,असा आरोप करून म्हांबरे म्हणाले,  दुसऱ्या बाजूने रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी राहणाऱ्या गोवेकर कुटुंबांना कोळशाच्या धुरामुळे अनेक शारीरिक व्याधींचा सामना करावा लागणार असून त्याची सरकारला अजिबात पर्वा नाही.
केंद्र सरकार प्रकल्प गोव्यावर थोपत आहेत व ते करण्याआधी त्यांना साधी कल्पनाही देत नाहीत.साऊथ वेस्टर्न रेल्वे मार्ग दुपदरीकरण हा असच एक प्रकल्प आहे,असे सांगून म्हांबरे म्हणाले, कर्नाटकाकडून म्हादईचे वळविण्यात आलेले पाणी हा असच गोव्यावर थोपलेला एक प्रकल्प ज्याला केंद्र सरकारचा आशीर्वाद आहे. बहुतेक गोवेकरांसाठी म्हादई ही जीवनदायिनी आहे. अनेक गोमंतकीय कुटुंबे जगण्यासाठी म्हादईच्या पाण्यावर अवलंबून आहेत.मात्र सावंत सरकारला त्याचा विसर पडला आहे.
 गोव्यातील भाजप सरकार पूर्वीच्या काँग्रेस सरकारचाच कित्ता गिरवत आहे. काँग्रेस सरकारने केंद्र सरकारचे आदेश पाळण्यातच धन्यता मानली. भाजप सरकारही तेच करीत आहे,असे सांगून म्हांबरे म्हणाले, डॉ. सावंत यांनी मुख्यमंत्री या नात्याने गोवेकरांसाठी गोव्याचे रक्षण करावे आणि यामध्ये पक्ष राजकारणाचा विचार करू नये किंवा तो मुद्दा आणू नये.
 मुख्यमंत्री सावंत यांनी राज्याला अधोगतीकडे नेणारा मार्ग बदलला नाही तर गोवेकर आंदोलने आणि संघर्ष करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत,असा इशारा म्हांबरे यांनी दिला आहे.