गुदिन्हो यांच्याहस्ते अपघात ग्रस्ताना नुकसान भरपाई

0
237

 

गोवा खबर:वाहतूकमंत्री  माविन गुदिन्हो यांनी सडक अपघात गोवा राज्य अंतरिम भरपाई योजनेखाली अपघात ग्रस्त व्यक्तींना मंजूरी पत्रे वितरीत केली. पर्वरीतील सचिवालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ही नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली. रस्त्यावरील अपघातात बळी पडलेल्या व्यक्तींना व त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

 गुदिन्हो यांनी या योजनेचा फायदा घेण्यासाठी वाहतूक खात्याकडे भेट देण्याचे आवाहन अपघातात बळी पडलेल्या व्यक्तींना केले आहे. अधिकाधिक लोकांना या योजनेची माहिती नसल्याने काहींनी त्या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेखाली श्री गुदिन्हो यांच्याहस्ते सुमारे २२ मंजूरी पत्रे वितरित करण्यात आली.

२०१५ साली वाहतूक खात्याने ही योजना अंमलात आणली होती पण या योजनेचा तेवढा प्रसार झाला नसल्याने आतापर्यंत थोड्याच लोकांनी खात्याकडे भेट दिल्याचे ते म्हणाले. वाहतूक खात्याने ही योजना सुलभ करण्यासाठी प्रयत्न केले असून त्याव्दारे लोकांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करण्यात येते. आतापर्यंत या योजनेचा सुमारे १२२ लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे.

     या योजनेखाली मृत्यू झाल्यास २ लाख रूपये, कायम दुखापतीसाठी १.५० लाख  रूपये, गंभीर कायम दुखापतीसाठी इस्पितळात उपचार घेण्यासाठी १ लाख रूपये तात्काळ मदत देण्यात येते, त्याचप्रमाणे कमी दुखापतीसाठी ५० हजार रूपये देण्यात येतात. ३ ते ७ दिवस इस्पितळात उपचार घेण्यासाठी १० हजार रूपये देण्यात येतात.

     वाहतूक खात्याचे वाहतूक संचालक श्री राजन सातार्डेकर, उपसंचालक (उत्तर) श्री प्रल्हाद देसाई, उपसंचालक (दक्षिण) श्री. आयवो रॉड्रीगीज, लेखा अधिकारी श्री सुबराज काणेकर आणि साहाय्यक संचालक श्री जॅक डिसौझा यावेळी उपस्थित होते.