नवी दिल्ली:स्वदेशी बनावटीचा हलक्या वजनाचा गाईडेड बॉम्ब एसएएडब्ल्यू अर्थात स्मार्ट ॲण्टी एअरफिल्ड वेपनची आज ओडिशातल्या चंडिपूर इथं भारतीय हवाई दलाच्या विमानातून यशस्वी चाचणी घेण्यात आली. विमानातून गाईडेड बॉम्ब डागण्यात आला आणि या बॉम्बनं अचूक दिशादर्शक प्रणालीच्या सहाय्यानं 70 किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांचा अचूक वेध घेतला. वेगवेगळं वातावरण आणि अंतरासाठी घेण्यात आलेल्या तीनही चाचण्या यशस्वी झाल्या. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ, संशोधन केंद्र इमरात (आरसीआय) तसेच डीआरडीओच्या इतर प्रयोगशाळा आणि भारतीय हवाई दलानं हा बॉम्ब विकसित केला आहे.

संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांनी या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओचे संशोधक आणि भारतीय हवाई दलाचं अभिनंदन केलं आहे. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. एस. ख्रिस्तोफर यांनीही अभिनंदन केलं असून हा बॉम्ब लवकरच संरक्षण दलात सामील केला जाईल.