गांधी: विलक्षण जीवनदृष्टी!:डॉ. रुपेश पाटकर

0
376
माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक असल्यामुळे माझ्या लहानपणी आमच्या घरात गांधी आणि गांधीवाद यांविषयी पूज्यभाव होता. साहजिकच मलादेखील त्या काळात गांधीजी पूज्य वाटत. पण त्यांच्याविषयी वाचायला किंवा ऐकायला मला मुळीच रस वाटत नसे. आणि रस वाटावा तरी का? ना गांधींकडे आकर्षक चेहरा होता, ना नाट्यमय प्रसंगांचं चरित्र होतं. होतें फक्त नेहमीच ऐकून बोथट झालेले ‘सत्य’ आणि ‘अहिंसा’. गांधीनी या दोन्हींची केलेली पराकाष्टा म्हणजे मूर्खपणा वाटे. चरखा चालवणं, कचरा काढणं, उपास तपास यांनी का कधी स्वातंत्र्य मिळतं? एवढी मोठी ब्रिटिश साम्राज्यसंस्था यांच्या मूठभर मीठ उचलल्याचे थोडीच हादरली असणार! त्याकाळात माझ्या मनात नेहमीच हे प्रश्न असत. पण ज्याअर्थी माझ्या घरातील मोठी माणसे त्यांना पूज्य मानतात, त्याअर्थी मीपण त्यांना पूज्य मानले पाहिजे, असे मी माझ्या मनाला समजावीत असे. थोडक्यात, गांधींविषयीचा त्याकाळचा माझा पूज्य भाव आंधळा होता.
जसजसा मी मोठा होऊ लागलो व बाहेरच्या जगाशी माझा संबंध वाढू लागला, तसतशी माझ्या मनातील गांधींविषयीची प्रश्नचिन्हे वाढू लागली. वैचारिक प्रगतीपुढे आंधळा पूज्यभाव कमकुवत होऊ लागला.
कॉलेजात जाईपर्यंत शालेय अभ्यासक्रमातील माहिती वगळता मी त्यांच्याविषयी काहीही वाचले नाही. कॉलेजात असताना परीक्षेच्या काळात अभ्यासात विरंगुळा म्हणून आणि विरंगुळ्यासाठी दुसरे काही उपलब्द नसल्यामुळे नाईलाजाने मी पहिल्यांदा ‘सत्याचे प्रयोग’ वाचले. त्या पहिल्या वाचनाने माझा गांधींविषयीचा नकारात्मक भाव कमी झाला नाही, पण या अफलातून व्यक्तीविषयी कुतूहल मात्र निर्माण झाले. माझ्या मनात त्यांच्याविषयीच्या प्रश्नांची संख्या वाढली. गुजराथेतील एका दिवणाचा सामान्य बुद्धीचा, भित्र्या बुजऱ्या स्वभावाचा, तुमच्या-माझ्यासारखा सामान्य मुलगा, ज्याला मुंबईच्या कोर्टात सभाधिटपणाच्या अभावी एक साधी केस चालवता आली नाही, तो नोकरीच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेला गेला आणि वीस वर्षांत लोकमान्यांचा उत्तराधिकारी होण्याची ताकद घेऊन आला, ही गोष्ट मला आश्चर्याची वाटू लागली. या व्यक्तीकडे ना प्रभावी व्यक्तिमत्व होते, ना प्रभावी वक्तृत्व होते. लोकांत आवेश- भावनिक उन्माद निर्माण होऊ शकेल असे प्रभावी विचारही नव्हते. तरीही तो दक्षिण आफ्रिकेतील भारतीय लोकांचा नेता बनला. त्याच्या सत्य- अहिंसेच्या सकृतदर्शनी मूर्खपणा वाटणाऱ्या आत्मक्लेशदायी तत्त्वज्ञानावर त्याच्या तेथील अनुयायांनी विश्वास ठेवून हाल भोगले आणि एवढेच नव्हे तर जनरल स्मट्ससारख्या खंदया लढवय्याने ह्या निशस्त्र निरुपद्रवी लोकांपुढे हार मानली.
मी पुन्हा जाणीवपूर्वक ‘सत्याचे प्रयोग’ वाचून काढले. या दुसऱ्या वाचनानंतर मला गांधींविषयी थोडीशी जवळीक वाटू लागली. तरीही त्यांचे सत्य-अहिंसेचे तत्वज्ञान मला पचत नव्हते. माझा निशस्त्र प्रतिकारावर विश्वास बसत नव्हता. एखाद्या ठिकाणी, एखाद्या वेळी, एखादा हुकूमशहा भावनाविवश होऊ शकतो, असा माझा गांधींच्या आफ्रिकेतील विजयाविषयी निष्कर्ष होता. पण माझे मन गांधींविषयी सतत विचार करत राहिले. माझ्या लक्षात आले की गांधींनी आपल्या नव्या नीतीने केवळ जनरल स्मट्सलाच भावनाविवश केले असे नाही, आयुष्यभर ते अनेक लढाया याच नीतीने लढले. चंपारण्य, खेडा, अमदाबादचा मजुरांचा प्रश्न इत्यादी प्रत्येक प्रश्नात त्यांनी निशस्त्र प्रतिकाराची नीती वापरली आणि प्रत्येक लढाई ते जिंकत गेले. ते एक जुनाच पण उपेक्षित सिद्धान्त नव्या स्वरूपात सिद्ध करत होते. हा सिद्धांत होता, ‘हृदयपरिवर्तनाचा’!
गांधींचे विजय लक्षात आल्यानंतर मला स्वस्थ बसवेना. मी त्यांची मिळतील तितकी पुस्तके वाचायला सुरुवात केली. १९०८ ला लिहिलेल्या ‘हिंद स्वराज’ या पुस्तिकेतून त्यांचे जीवनविषयक सर्व तत्वज्ञान प्रकट झाले होते. शेवटपर्यंत ते या जीवनतत्वज्ञानावर अढळ राहिले. त्यांचे तत्वज्ञान जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासाठी होते. त्यांच्यासाठी सामाजिक जीवन आणि वैयक्तिक जीवन वेगळे नव्हते. त्यांचा सत्याग्रह जसा जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध चाले तसाच प्रेमळ कस्तुरबाविरुद्धही चाले. आणि का नाही चालणार? तो तर प्रेमाचा सिद्धांत होता. विरुद्ध बाजूच्याच्या कल्याणाचाही त्यात विचार होता. हृदयपरिवर्तन हे त्याचे मूळ होते.
गांधींच्या लढाईचे वैशिष्ट्य असे की त्यांचे ध्येय दुष्ट शत्रूंचा नाश नसून शत्रूच्या दुष्टत्वाचा – दुर्गुणाचा नाश हे होते. त्यांना अध:पतीत – बिघडलेल्या विरोधकांची नैतिक उन्नती साधायची होती. माणूस हा मुळात वाईट नसून परिस्थितीमुळे वाईट होतो. जर त्याला त्याचा उणेपणा दाखवून दिला आणि त्याचा विवेक जर आपण जागवू शकलो तर तो पुन्हा चांगला बनू शकतो. हा मानसशास्त्राचा मूलभूत सिद्धांत गांधी वापरात होते.
शत्रूशी शारीरिक बळाने तोंड देण्याची त्याना भीती वाटत नव्हती. दक्षिण आफ्रिकेत ब्रिटिशांची प्रजा म्हणून कर्तव्यभावनेने झुलू -बोअर युद्धांत आरोग्य कर्मचारी म्हणून आपल्या हिंदी तुकडीसह त्यांनी रणांगणात काम केले होते. शत्रूला शक्तीने वाकवण्याची ताकद असूनसुद्धा त्याला प्रेमाने समजावण्याचा त्यांचा मार्ग होता. त्यांची अहिंसा परिस्थितीवश नव्हती. त्यांचा विरोध ‘पॅसिव्ह रेजीस्टन्स’ नव्हता. तो सत्याग्रह होता. त्यांच्या सत्याग्रहासाठी अमर्याद मानसिक शौर्याची गरज होती. समोरची व्यक्ती शारीरिक बळ वापरत असताना, आपण शारीरिक बळ न वापरता, परिस्थिती सोडून पळून न जाता, मरेपर्यंत सत्यावर दृढ राहणे म्हणजे त्यांचा सत्याग्रह होता.
गांधींचे देशप्रेम हे भारत नावाच्या भौगोलिक क्षेत्रावर नव्हते, तर त्या जमिनीवर राहणाऱ्या लोकांवर होते. त्यामुळे त्यांना केवळ अभिमानाखातर गोऱ्या साहेबाला घालवून काळ्या साहेबाचे राज्य आणायचे नव्हते. त्याना गरीबतील गरीब देशबांधवाची उन्नती साधायची होती. त्यामुळे राजकीय स्वातंत्र्यासाठी चळवळ करतानाच ते विधायक कार्यक्रम राबवत होते. आपल्या गरीब देशबांधवाना काम देणे, हा त्यांचा ‘स्वदेशी’ मागचा विचार होता. ‘स्वदेशीचा वापर आणि परदेशी मालावर बहिष्कार’ या त्यांच्या नीतीने व्यापारी इंग्रजांच्या  भारतावर राज्य करण्याच्या मूळ उद्देशालाच हादरा दिला.
  • गांधी जन्मतःच महात्मा नव्हते. ते कोणतेही दैवी गुण घेऊन जन्माला आले नाहीत. एखाद्या सामान्य भारतीय घरात जे संस्कार मुलांवर होतात, तेच संस्कार त्यांच्यावर झाले. दक्षिण आफ्रिकेत जाईपर्यंत ते एक सामान्य सज्जन तरुण होते. दक्षिण आफ्रिकेत जाताना पैसे मिळवून श्रीमंत सुखवस्तू होणे हेच त्यांचे ध्येय होते. पण आफ्रिकेतील जीवनात प्रसंगानुरूप जे जे विचार समोर येतील, त्या त्या विचारांचा संस्कार त्यांनी स्वतःवर होऊ दिला. रस्किनच्या ‘सर्वोदय’ आणि टॉल्स्टॉयच्या ‘वैकुंठ तुझ्या हृदयात’ या दोन पुस्तकांनी त्यांची जीवनशैली बदलून टाकली. त्यांचे ध्येय केवळ राजकीय हक्कांपुरते मर्यादीत न राहता ते गरीबतील गरिब माणसाच्या उन्नतीपर्यंत पोचले. वकीलापासून भंग्यापर्यंतचे सर्व व्यवसाय सारख्याच मोलाचे असून प्रत्येक माणसाने स्वतःच्या भाकरीसाठी शारीरिक श्रम केलेच पाहिजेत. नाहीतर ती श्रमचोरी ठरेल, असा विचार त्यांच्या मनात दृढ झाला. त्याच्याही पुढे जाऊन ‘गरजेपेक्षा जास्त साठवणे’ हीसुद्धा चोरी आहे, असा विचार ते करू लागले.
निसर्ग रोज आवश्यक असेल तेवढेच निर्माण करतो. त्यामुळे साठवण्याची प्रवृत्ती कुणाच्या ना कुणाच्या जीवनात कमतरता नक्कीच निर्माण करणार.  शिवाय उद्यासाठी साठवणे म्हणजे जगतपालक परमेश्वरावर अविश्वास, असा त्यांचा युक्तिवाद होता. म्हणून त्यांनी चांगली चाललेली स्वतःची वकिलीची प्रॅक्टिस सोडून ‘स्वेच्छेची गरिबी’ स्विकारली. आणि ते आश्रमी जीवन जगू लागले. त्यांना हे चांगलेच ठाऊक होते की स्वेच्छेची गरिबी म्हणजे स्वतःकडील सर्व संपत्तीचा क्षणात त्याग हे सहजासहजी प्रत्येकाला शक्य होणार नाही म्हणून त्यानी विश्वस्ताची कल्पना मांडली. त्या कल्पनेप्रमाणे आपल्याकडील संपत्ती ही आपल्या मालकीची नसून ती आपल्याकडे असलेली परमेश्वराची ठेव समजावी व तिचा विनियोग स्वतःसाठी न करता समाजसेवेसाठी करावा व आपल्या उपजीविकेचे साधन शारीरिक श्रम हेच ठेवावे. ही सर्व वैचारिक वाटचाल करताना ते अनेकदा चुकले. पण चूक समजल्यानंतर प्रत्येकवेळी ती कबुल करून ते सुधारत गेले. स्वतःच्या विचारांवर पूर्ण विश्वास असुनही, त्यांचे अंधानुकरण न करता, विवेकाच्या कसोटीवर जेवढे उतरेल, तेवढेच स्विकारण्याची सूचना त्यांनी आपल्या अनुयायांना केली.
गांधींच्या विचारांची भिस्त आत्मिक उन्नतीवर होती. धर्माच्या सनातन तत्वांवर त्यांची श्रद्धा होती. मोक्ष अथवा जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमची मुक्ती हे त्यांचे जीवनध्येय होते. ते साध्य करण्यासाठी त्यांची सारी धडपड होती. सत्य हा परमेश्वर असून त्याच्याकडे जण्याचा मार्ग म्हणजे अहिंसा असे ते म्हणत. पण शरीर असेपर्यंत पूर्ण अहिंसा पाळणे आणि सत्याचे पूर्ण दर्शन घडणे शक्य नाही असे ते म्हणत.  सर्व प्राणिमात्रात अखंड वास करणाऱ्या परमेश्वराची पूजा आपल्या प्रत्येक कृतीतून व्हावी, यासाठी ते प्रयत्नशील असत. ईश्वरी इच्छेशिवाय आपल्या सर्व प्रयत्नांची किंमत समाज परिवर्तनाच्या दृष्टीने शून्य आहे असे त्यांचे मत होते. अंतरात्म्याच्या आवाजपुढे त्यांना भौतिक परिणामांची फिकीर उरली नाही. निराकार ईश्वराची कल्पना त्यांना जास्त पटत होती तरीसुद्धा नामस्मरण व प्रार्थना यावरील त्यांचा विश्वास दृढ झाला होता. शेवटी प्रार्थनेला जाताना रामनाम घेत ते हे जग सोडून गेले.
मी इथे मला समजलेली गांधींची जीवनदृष्टी मांडण्याचा प्रयत्न केला. गांधींच्या काळात त्यांच्या विनोबांसारख्या अनेक अनुयायांनी ही जीवनदृष्टी स्वीकारली. गांधींच्यानंतर भारताबाहेर मार्टिन ल्युथर किंग सारख्यानी ह्याच मार्गाने वाटचाल केली. मला जाणवणारे या ह्या जीवनदृष्टीचे विशेषत्व म्हणजे ती कोणा अवताराने नव्हे तर एका सामान्य माणसाने स्वतःच्या जीवनात सिद्ध केलेली जीवनदृष्टी होती. तिच्या प्रभावामुळे गांधी आम्हाला महात्मा वाटले, एवढेच!