गणेशोत्सवासाठी बाजारपेठा गजबजल्या

0
1241
गोवा:उद्यापासून  गोव्यात गणेशचतुर्थी उत्सव सुरु होत असून त्यासाठी घरोघरी गणेशभक्तांनी जय्यत तयारी केली आहे.  विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनासाठी गणेश भक्त सज्ज झाले आहेत. गोव्यातील चतुर्थी उत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत चालणार असून घरगुती गणेशोत्सव प्रामुख्याने दीड दिवस, पाच, सात, नऊ दिवसांचा असतो. सार्वजनिक मंडळाचे गणेशोत्सव अकरा दिवस चालतात.
गणेशाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी रंगरंगोटी सजावट, आरास तसेच मखर करण्यात आली असून सार्वजनिक मंडळाची देखील लगबग सुरु आहे. बाजारपेठेत वाहनांची, लोकांची मोठी गर्दी होत असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. फळे, फुले, हार, सजावट साहित्याने बाजारपेठा झगमगत असून महागाई असली तरी खरेदीसाठी गर्दीची लाट उसळली आहे. शाळा-कॉलेज यांना सुमारे आठवडाभराची सुटी सुरु झाली असून शहरातील बहुतेक लोक आपापल्या मूळ गावी चतुर्थीसाठी रवाना झाले आहेत. नोकरी-धंदा-व्यवसायानिमित्ताने गोव्याबाहेर असलेली मंडळी गोव्यात परतली असून गणेशाचे आगमन होणार असल्याने सर्व अबाल-वृद्ध मंडळी आनंदीत दिसत आहेत.
चतुर्थी काळात गोव्यात मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी होते. त्यांची खास दुकाने बाजारपेठेत लागली असून त्यांची खरेदी-विक्री मोठय़ा प्रमाणात चालू आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात विविध प्रकारची नाटके, संगीत कार्यक्रम व इतर मनोरंजन जनतेसाठी उपलब्ध असून ते पाहण्यास मोठी गर्दी होते. चतुर्थीनिमित्त आता भजने, घुमट आरत्या व विविध गायन कार्यक्रम सुरु होणार असून ते अकरा दिवस चालणार आहेत. गणेशाच्या आगमनानंतर दीड दिवसांनी गणरायाला निरोप देण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.
यंदाच्या ऐन चतुर्थीच्या दिवसात नारळ महागल्याने माटोळीसाठी बांधण्यात येणारी नारळाची पेंडीचे दर वधारलेले होते. सुमारे 10 नारळाच्या भरभक्कम पेंडीचा दर व पोफळीच्या कात्र्याचा दर पाचशे ते हजार रूपयांच्या घरात होता. माट्टीचे कात्रे, कांगला, तसेच अनेक रानफळे बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. माशेल बाणस्तारी येथील माटोळी बाजार गजबजून गेला आहे.पणजी येथे मुख्य मार्केटच्या पुढे आणि मागे माटोळीचा बाजार भरला आहे.माटोळी हा गणेशोत्सवातील महत्वाचा घटक असल्याने दरवाढ होऊन देखील गणेश भक्त त्यांची खरेदी करण्यासाठी ठीकठीकाणच्या बाजारपेठे मध्ये दाखल झाले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशाच्या सजावटीसाठी गोव्यातील प्रमुख शहरांतील फूल मार्केट विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी गजबजलेले आहे. कोल्हापूर येथूल झेंडू, तर बंगळुरू येथूल गुलाबांची आयात मोठ्या प्रमाणात झाली आहे. आर्केड, जर्बेरा फुलांचे मखरही बाजारात दाखल झाले आहे.
गणेशोत्सवासाठी आवश्यक सगळ्याच साहित्याचे दर वाढले आहेत. सध्या मागणी वाढल्याने फुलांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. झेंडू, पांढरी शेवंती, गुलछडी, तेरडा, बिजली या सर्व फुलांची आवक वाढली आहे. विक्रीसाठी असलेल्या झेंडूचे दर प्रतिकिलो ३२० ते ३५० रुपये आहेत. पांढऱ्या सुवासिक शेवंतीलाही भरपूर मागणी असून, ही फुले पाच ते सहा दिवस कोमेजत नसल्याने काही दिवसांपासून त्यांची विक्री वाढली आहे. शेवंती व गुलाबाचे दरही प्रतिकिलो ३२० ते ४०० रुपये आहेत. मात्र वाढत्या दराचा विचार न करता, गणेशोत्सव एका दिवसावर असल्याने ग्राहकांनी फुले घेण्यासाठी पणजी मार्केटमध्ये गर्दी केली आहे.
गणेश व गौराईंना विविध प्रकारचे हार घातले जातात. जास्वंदीच्या कंठीमाळेसाठी सध्या ८० ते १०० रुपये, तर सफारी हारासाठी ३०० ते ४०० रुपये मोजावे लागत आहेत.
त्याचबरोबर पुष्पगुच्छही सध्या तेजीत आहेत. साधा पुष्पगुच्छ आता १५० ते २००, तर मोठा पुष्पगुच्छ २५० ते १००० रुपयांना मिळत आहे. आर्केड, जर्बेरा फुलांचे मखर बाजारात दाखल झाली असून १,५०० ते २,००० हजार रुपयांना ते विकले जात आहेत. माटोळीला लागणारे सुपारीचे कात्रे सुमारे दोनशे ते बाराशे रु. नारळाची पेंड दोनशे ते एक हजार रुपयांपर्यंत., केळीचे घड दोनशे ते आठशे रु., बाराशे, केळीची पाने शंभर नग- दोनशे
चाळीस रुपये रु., तोरण एक पन्नास ते शंभर रु., भोपळा छोटा दोनशे तर मोठा पाचशे रु., टरबूज पन्नास ते ऐंशी रु एक नग, चिकू दीडशे रु. प्रती डझन , पाच सफरंचद शंभर रु. मोसंबी शंभर रुपयांना पाच तर डाळिंब शंभर रुपयांना चार नग, टरबूज शंभर ते दीडशे रुपये एक, कांगले तीस रुपये जुडी. जंगली फळे प्रती नग तीस, पन्नास, साठ रूपये नग, आंबाडे दोनशे रूपये शेकडा या दराने वीकली जात आहेत.