गठबंधन सरकार आले तर रोज नवीन पंतप्रधान-शहा

0
1094
गोवा खबर:काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोवा दौऱ्यात अनपेक्षितपणे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन त्या भेटीशी राफेलला जोडून तुच्छ राजकारण केले आहे.राहुल यांच्या नेतृत्वाखाली गठबंधन मजबूर सरकार देण्याच्या लायकीचे असेल मजबुत सरकार देण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला 2019 मध्ये निवडून द्या,असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज गोव्यात केले.
पणजी जवळील बांबोळी येथील सागच्या मैदानावर जमलेल्या बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शहा आज गोव्यात दाखल झाले होते.शहा यांनी गोव्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने हजारो कोटी रुपये उपलब्ध करून दिले असल्याचे सांगतानाच गोव्यातील खाण प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे स्पष्ट केले.

 मोदी यांच्या विरोधात तयार होत असलेल्या गठबंधनची खिल्ली उडवताना शहा म्हणाले,उद्या जर गठबंधन सरकार आले तर सोमवारी मायावती पंतप्रधान असतील,मंगळवारी अखिलेश बुधवारी देवेगौडा, गुरुवारी चंद्राबाबू नायडू,शुक्रवारी स्टेलिन,शनिवारी शरद पवार पंतप्रधान असतील,आणि रविवारी देशाला सुट्टी असेल.

55 वर्षे राज्य करून देखील देशाला अपेक्षित विकासा पर्यंत नेण्यास अपयशी ठरलेल्या काँग्रेसला आमच्या 55 महिन्यांच्या कामाची माहिती मागण्याचा अधिकार नसल्याचा दावा करत भाजप सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती शहा यांनी यावेळी दिली.आजारी असून देखील मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गोव्याच्या विकासाचे प्रश्न घेऊन केंद्राशी सतत पाठपुरावा करत असतात असे सांगून त्यांच्या सारखा मुख्यमंत्री आपण आयुष्यात बघितला नाही असे शहा म्हणाले.भाजपचा कार्यकर्ता कसा निष्ठेने काम करतो त्याचे पर्रिकर हे उत्तम उदाहरण असल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले.

शहा यांनी सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख करत पर्रिकर आणि मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची संरक्षण व्यवस्था भक्कम करण्यासाठी प्रयत्न भाजप सरकारने केल्याचा दावा केला.यावेळच्या बजेट मध्ये संरक्षण मंत्रालयासाठी करण्यात आलेल्या सर्वाधिक तरतूदीचा उल्लेख शहा यांनी केला.

पाच वर्षे गोव्यासाठी केले कार्य : नरेंद्र सावईकर
भाजपने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला खासदार केल्यानंतर गेली पाच वर्षे मी आणि उत्तर गोव्याचे खासदार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक गोव्याच्या विकासासाठी राबत आहोत. काँग्रेसच्या खासदारांनी गोव्यासाठी काहीही केले नाही. पण गेल्या पाच वर्षांत भाजपने गालजीबाग-तळपण, झुआरी, मांडवी नदीवरील पूल असे प्रकल्प आणले. येणारी लोकसभा निवडणूक ही विकासाची निवडणूक आहे. पाच वर्षांत देशात आणि गोव्यात जो विकास झाला त्याच्या आधारे आम्ही निवडणुकीस सामोरे जात आहोत. पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावेत यासाठी ही निवडणूक आहे. विकास पाहूनच गोव्यातील दोन्ही उमेदवार येत्या लोकसभा निवडणुकीत निवडून द्या, असे आवाहन . सावईकर यांनी केले.

१९ वर्षांत हजार प्रकल्प : श्रीपाद नाईक
उत्तर गोव्यात १९ वर्षांच्या माझ्या कारकिर्दीत १ हजार प्रकल्प राबवले गेले. गेल्या पाच वर्षांतच मी आणि सावईकर यांनी खासदार निधीतून दोन्ही जिल्ह्यात अनेक प्रकल्प मार्गी लावले. येत्या निवडणुकीतही सर्वांनी भाजपला साथ द्यावी. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच आवश्यक आहेत, त्यामुळेच सर्वांनी आपापल्या बुथावर उमेदवार जिंकून येईल या हेतूने काम करावे, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी बुथ कार्यकर्त्यांना आवाहन केले.

काँग्रेसने गोव्याचा विकास अडवला : विनय तेंडुलकर
काँग्रेसच्या काळात गोव्यात विकासासाठी निधी मागायला गेल्यानंतर गोव्यात भाजपचे सरकार आहे असे म्हणत गोव्याला विकासासाठी निधी दिला जात नव्हता. काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस आणि गोव्यातील काँग्रेसचे नेते गोव्यात भाजप सरकार असल्यामुळे निधी नाकारत होते. पण भाजपच्या राजवटीत गोव्यात विकासाला सुरुवात झाली, असे तेंडुलकर म्हणाले.

श्रीलंकेसारखी आता काँग्रेसची गत होईल : पर्रीकर
एकत्र रहा, लहान सहान गोष्टी विसरून गोव्यासाठी एकत्र रहा. तुम्ही एकत्र राहिल्यास पूर्वीच्या काळी जी गत श्रीलंकेची झाली होती तीच गत आताच्या काळात काँग्रेसची होईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले. मोठे भाषण हे निवडणुकीसाठी राखीव ठेवूया, असे म्हणत ते मोजकेच बोलले पण त्यांनी भाजप कार्यकर्त्यांन एकत्र राहण्याचा सल्ला दिला. हजारोंच्या संख्येने सभेला आलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र राहून नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी चंग बांधावा, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

शहा यांनी गोव्यात येताच दोनापावल येथे जाऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली. त्यानंतर पर्रिकर यांनी आपण कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी तुमच्या सोबत येत असल्याचे सांगत 6 वाजता शहा यांच्या सोबत पर्रिकर सभास्थळी दाखल झाले.पर्रिकर यांनी बसून भाषण करताना केंद्रात मोदी यांचे सरकार पुन्हा आणण्यासाठी छोटे मोठे मतभेद विसरून एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.