खून का बदला खून से लो; माजी सैनिकांची मागणी

0
897
गोवा खबर: जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे जवानांवर झालेल्या भ्याड  हल्ल्याचा आज देखील गोव्यात तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.माजी सैनिक संघटनेने पणजी येथे शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहताना गरज पडली तर आम्ही पुन्हा सैन्यात येण्यास तयार आहोत असे सांगत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

पणजी येथील आझाद मैदानावर पार पडलेल्या कार्यक्रमात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिल्या नंतर हिंदुस्तान झिंदाबाद,पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत खून का बदला खून से लो अशी मागणी करण्यात आली.
यावेळी अनंत जोशी,कॅप्टन दत्ताराम सावंत,कृष्णा शेटकर, नामदेव नारोलकर,नायर,दास,श्रीवास आदि उपस्थित होते.
दरम्यान काल अभाविप आणि शिवसेनेने निदर्शने करीत जोरदार निषेध केला. अभाविपने पणजी  कदंब स्थानकावर निषेध सभा घेऊन जैश ए मोहम्मद संघटनेच्या अतिरेक्याचा पुतळा जाळला आणि शाहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. दहशतवादाचे समूळ निर्मूलन करण्याची मागणी या प्रसंगी वक्त्यांनी केली.
 अभाविपचे विद्यार्थी नेते संकल्प फळदेसाई, अभिदीप देसाई, ऋषिकेश शेटगांवकर, सौरभ बोरकर, पूजन प्रिओळकर, प्रभा नाईक यांनी भाषणाद्वारे आपल्या संवेदना व्यक्त केल्या. पाकिस्तानचा बचाव करण्यासाठी धावणारे नवज्योत सिद्धू तसेच फारुख अब्दुल्ला याचा निषेध करण्यात अभाविपने निषेध केला. दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करुन दहशतवादाचे समूळ निर्मूलन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
 
दरम्यान, शिवसेनेने शिवोली येथे निषेध सभा घेतली. मेणबत्ती मोर्चा काढून निषेध करण्यात आला तसेच आत्मघातकी दहशतवाद्याचा पुतळा जाळण्यात आला. या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा काळ आता आलेला आहे, असे शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत म्हणाले. आजकाल युवक पैशांच्या हव्यासापोटी दहशतवादाकडे वळतान की अन्य काही कारणांमुळे याची चौकशी केली जावी. भारतातील अशा युवकांना हाताशी धरुनच दहशतवादी हल्ले घडवून आणले जात आहेत ही चिंतेची बाब आहे, असे ते म्हणाले.