खासदार निधीतून होंडा उच्च माध्यमिक शाळेत स्वातंत्र्य चळवळीवर आधारित संग्रहालय व ग्रंथालयाची उभारणी

0
1117

 

 

गोवा खबर:कृष्णराव राणे – सरदेसाई मेमोरिअल फाउंडेशन, सालेली यांच्या होंडा उच्च माध्यमिक प्रशालेत केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांच्या खासदार निधी मधून स्वातंत्र्य चळवळीवर आधारित संग्रहालय व ग्रंथालयाची उभारणी करण्यात आली आहे. या संग्रहालयाचे व ग्रंथालयाचे उद्घाटन आज श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

 

उद्घाटन सत्रात आपले मनोगत व्यक्त करताना नाईक यांनी उत्तम शैक्षणिक कामगिरीबद्दल शाळेचे कौतुक केले. व्यवस्थापन, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी खडतर प्रवासात केलेले कार्य मोलाचे आहे; त्याचेच फलित म्हणून शाळेचा निकाल गेले तीन वर्ष १०० टक्के लागत आहे व त्यासाठी सर्वजण अभिनंदनास पात्र असल्याचे नाईक यांनी नमूद केले.

 

होंडा उच्च माध्यमिक प्रशाला एक आदर्श संस्था म्हणून सर्वांसमोर येत आहे, सर्वांच्या समन्वयाने हे साध्य झाले असून गावपातळीवर हि कामगिरी महत्वपूर्ण असल्याचे नाईक यांनी सांगितले. समाजनिर्मितीमध्ये शिक्षण व संस्कार दोन्ही महत्वाचे घटक आहेत व अशाप्रकारे काम करणाऱ्या समाजाचे भवितव्य चांगले असते. एकत्र कुटुंबाप्रमाणे संस्था काम करते, तेव्हा हे घडते, असे विचार नाईक यांनी मांडले.

 

समाजानेच दिलेले दान योग्य पात्री देणे, हि माझी जबाबदारी आहे, अशी भावना नाईक यांनी यावेळी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी जलतरण, रॉक क्लाइंबिंग व इतर सर्व क्रीडाप्रकारात विद्यार्थ्यांना उतरवावे, असे आवाहन नाईक यांनी याप्रसंगी केले. यासाठीचे एक पाऊल म्हणून आपल्या खासदार निधीतून एक कोटी व राज्यसभा सदस्य विनय तेंडूलकर यांच्याकडील निधीतून एक कोटी, अशी दोन कोटी रुपयांची तरतूद करून क्रीडा संकुल उभे करण्याचा मानस श्रीपाद नाईक यांनी बोलून दाखविला. ज्याचा फायदा संपूर्ण सत्तरी तालुक्यातील मुला-मुलींना होईल.

यासोबतच खासदार निधीतून शाळेला संगणक तसेच कार्यालयीन उपकरणे देखील पुरविण्यात आली आहेत.

 

या उद्घाटन कार्यक्रमात राज्यसभा खासदार विनय तेंडूलकर, फाउंडेशनच्या अध्यक्षा शशिकला राणे, विश्वजित राणे, व्यवस्थापक अॅड. निंबाळकर, व्यवस्थापकीय सदस्य राजसिंग राणे, मुख्याध्यापक साजन सेबेस्टियन आदि मान्यवर उपस्थित होते.