खासदार निधीखाली केरी-फोंडा विकासकामांचा जिल्हाधिकारी मेनका यांनी घेतला आढावा

0
943

 

 

गोवा खबर:केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी ‘सांसद आदर्श ग्राम योजने’ खाली (सॅगी) दत्तक घेतलेल्या केरी- फोंडा गावाच्या विकासासाठी निश्चीत केलेल्या सुमारे 514 विकासकामांचा आढावा उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी गुरूवारी घेतला.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात  जिल्हाधिकारी आर. मेनका यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी विकास गावणेकर, फोंडा तालूक्याचे उपजिल्हाधिकारी तथा ‘सॅगी’चे समन्वयक केदार नाईक आणि खासदार नाईक यांचे प्रतिनिधी म्हणून स्वीय सचिव सुरज नाईक तसेच केरीचे सरपंच, उपसरपंच व पंच सदस्य उपस्थित होते.

यावेळी केरी – फोंडा गावातील ग्रामस्थांनी पाठवलेल्या सुमारे 514 विकासकामांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली.केरी गावातील सर्व विकासकामे खासदार निधीतून केली जाणार आहेत.  यातील अनेक कामांचे प्रस्ताव विविध सरकारी खात्याना पाठवण्यात आले असून त्यातील किती कामे मार्गी लागलेत, त्यात काय अडचणी आहेत यावर खात्याच्या अधिकार्‍यांकडून माहिती घेण्यात आली.

सरकारच्या जलस्त्रोत, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, महिला व बाल कल्याण , अग्निशामक आदी विविध खात्यांचे संचालक अथवा अधिकार्‍यांनी सदर विकासकामांबाबतची अधिक माहिती सादर केली. यापुढील बैठकीत या कामांचा पुन्हा आढावा घेऊन कामे सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.