खादी” ब्रॅण्डच्या नावाखाली बनावट पीपीई किटसची कंपन्याकडून विक्री, केव्हीआयसीचा कायदेशीर कारवाईचा विचार

0
445

 गोवा खबर:खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या (केव्हीआयसी) निदर्शनाला आले आहे की काही अप्रामाणिक उद्योग कंपन्या ‘खादी इंडिया’चा नोंदणीकृत ट्रेडमार्क लोगो फसव्या पद्धतीने वापरून वैयक्तिक संरक्षक अंगरखे (पीपीई) किट्स तयार करून विकत आहेत. केव्हीआयसीने स्पष्ट केले आहे कि आतापर्यंत त्यांनी बाजारात विक्रीसाठी पीपीई किटस आणलेले नाहीत.

दरम्यान खादी उत्पादनाच्या छाप्यात बनावट पीपीई किटस विकले जात असल्याची माहिती मिळाली असून असे करणे पूर्णपणे चुकीचे आणि सुरक्षेबाबत दिशाभूल करणारे आहे, असे आयोगाने म्हटले आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की केव्हीआयसी आपल्या उत्पादनांसाठी खास डबल ट्विस्टेड हातमागाच्या, हाताने विणलेल्या खादी कापडाचा वापर करते आणि म्हणून पॉलिस्टर आणि पॉलीप्रोपीलिन सारख्या न विणलेल्या कापडापासून बनवलेले किटस खादी उत्पादने किंवा केव्हीआयसी-मान्यताप्राप्त उत्पादने नाहीत.

केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना म्हणाले की केव्हीआयसीने खादी फॅब्रिकची स्वतःची पीपीई किटस विकसित केली असून ती चाचणीच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत. “अजूनतरी आम्ही बाजारात खादी पीपीई किटस आणलेली नाहीत. ‘खादी इंडिया’ च्या नावावर फसवणूक करून पीपीई किटस विक्री करणे बेकायदेशीर आहे. त्याच बरोबर त्यांच्या वापरामुळे कोरोना आजाराच्या रूग्णांबरोबर  नियमितपणे काम करणारे आपले डॉक्टर, वैज्ञानिक आणि निम-वैद्यकीय कर्मचारी यांच्या सुरक्षेस गंभीर धोका उद्भवू शकतो, असे ते म्हणाले. केव्हीआयसी अशा प्रकारे फसवणूक करणार्‍यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहे, असे सक्सेना म्हणाले.

दिल्लीतील एका कंपनीने बनवलेले बनावट पीपीई किट्स केव्हीआयसीचे उप- मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नारायण यांच्या लक्षात आणून देण्यात आले आहेत. केव्हीआयसीने कोणतीही पीपीई किटस विक्री सुरू केली नाही किंवा कोणत्याही खासगी एजन्सीला आउटसोर्स केलेले नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

सध्या केव्हीआयसी केवळ खास संरचनेच्या खादी फेस मास्कचे उत्पादन आणि वितरण करत आहे जे सर्वोच्च सुरक्षा मानकांशी सुसंगत आहे. हे मास्क तयार करण्यासाठी केव्हीआयसी डबल ट्विस्टेड खादी कापड वापरत आहे.  कारण यामुळे 70 टक्के आर्द्रता आतमध्ये टिकवून ठेवता येते. तसेच हे मास्क हातमागावर आणि हाताने विणलेल्या खादी कापडाचे बनलेले आहेत. ते श्वास घेण्यायोग्य, धुण्यायोग्य असून त्याची जैविक पद्धतीने विल्हेवाट (बायोडिग्रेडेबल) लावता येते.