खाण पेचप्रसंगावरील मौन भाजपने आता सोडावे : शिवसेनेची मागणी

0
944
गोवा खबर :  गोव्यातील लाखो लोकांवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या खाण पेचप्रसंगाबद्दल राज्यातील सत्तारूढ भाजपच्या आघाडीतील गोवा फॉरवर्ड या घटक पक्षाने विरुद्ध मत व्यक्त केले असताना भाजपने आपले मौन आणि अनिश्चितता संपुष्टात आणावी, अशी मागणी गोवा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
  खाण उद्योगातील सध्याचा पेचप्रसंग सोडवण्यात भाजपला अपयश आले तर गोवा फॉरवर्ड पार्टी भाजपला पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका या पक्षाने घेतली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावरील भाजपच्या मौनामुळे आघाडीतील त्याच्या घटक पक्षांमधेच अस्वस्थता असल्याचे यातून प्रतिबिंबित होते, असे स्पष्ट मत गोवा शिवसेनेच्या उपाध्यक्ष व प्रवक्त्या राखी प्रभुदेसाई नाईक यांनी व्यक्त केले आहे.
  भाजपने या विषयावर बोलावे, अशी मागणी सर्वप्रथम शिवसेनेनेच केली, असे सांगून प्रभुदेसाई नाईक म्हणाल्या,  सध्या भाजप दिशाहीन झालेला असल्याने तो या प्रश्नावर मौन बाळगून अनिश्चितता कायम ठेवेल अशी आमची अटकळ होतीच. राज्यातील सत्य परिस्थितीशी भाजपला काहीही देणेघेणे नाही विद्यमान खासदार नरेंद्र सावईकर यांच्यासारखे  काही नेते तर लोकसभेचे तिकीट मिळवण्याचे स्वप्न पाहण्यात गर्क आहेत.
   खाण उद्योग पूर्ववत सुरू करण्यात सरकारला सतत येत असलेले अपयश आणि त्याची अकार्यक्षमता यामुळे खाण पटट्यातील लोकांमधे प्रचंड असंतोष खदखदत आहे. खाण उद्योगाच्या सद्य:स्थितीला केवळ आणि केवळ भाजपच जबाबदार आहे, असा आरोप नाईक यांनी केला आहे.
  खाण उद्योग २०१२ सालापर्यंत व्यवस्थित चालू होता; पण भाजप सत्तेवर आल्यापासून सगळे अडथळे  निर्माण झाले यावरूनच या उद्योगासंबंधातील भाजपचा दोष स्पष्टपणे दिसतो. या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या लोकांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्नच झालेले नाहीत,याकडे नाईक यांनी लक्ष वेधले.
  भाजपला खाण उद्योग पुन्हा सुरू व्हावा असे वाटतच नाही, हे या पक्षाने कबूल करावे, असे आव्हान देऊन नाईक म्हणाल्या, भाजप बहुदा निवडणूक येण्याची वाट पाहात आहे. निवडणुका जवळ आल्यानंतर खाण उद्योग सुरू करण्यासाठी विविध संस्थांना एकत्र आणण्याची क्लृप्ती वापरली की खाण उद्योगाला चांगले दिवस येतील या आशेने लोक त्यांना मते देतील असे त्यांना वाटत आहे.मात्र हा त्यांचा गोड गैरसमज ठरेल. लोकांच्या भावनांशी खेळणे भाजपने आता थांबवले नाही तर त्याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
 गोवा फॉरवर्ड पक्ष जर खरोखरच खाण प्रश्नावर भाजपवर नाराज असेल तर त्यांनी त्याबाबत आवाज उठवून गप्प बसण्या ऐवजी सरकारमधून बाहेर पडावे. या पक्षाने लोकांना जमेला धरू नये आणि खाण उद्योगाचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग करू नये, असा इशाराही नाईक यांनी दिला आहे.