खाण उद्योगासाठी समांतर किमान आर्थिक सहाय्य देण्याचे शिवसेनेचे आश्वासन 

0
702
 गोवा खबर: खाण उद्योग पूर्ववत सुरू व्हावा यासाठी शिवसेना वचनबद्ध आहे. सध्या हा विषय प्रलंबीत आहे.त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्यांसाठी हा पक्ष केंद्रीय कायद्यांनुसार किमान आर्थिक आधार देण्याची तरतूद करेल, असे  आश्वासन शिवसेनेच्या दक्षिण गोव्यातील उमेदवार राखी प्रभुदेसाई नाईक यांनी दिले. 
   खाण उद्योगातील अवलंबितांच्या संकटकाळात शिवसेना त्यांच्यामागे ठामपणे उभी राहिलेली आहे. इतकेच नव्हे तर गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये नवी दिल्लीत झालेल्या निदर्शनांंमधेही पक्ष सहभागी झाला होता, याचे राखी नाईक यांनी यावेळी स्मरण करून देत त्या म्हणाल्या, आम्ही कायमच खाण अवलंबितांबरोबर आहोत. त्यांचा आवाज संसदेत उठवण्याचे आश्वासन मी शिवसेनेतर्फे देते. गोव्याचे भाजपचे खासदार ते करण्यात अपयशी ठरले आहेत. एकदा निवडून आल्यावर या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या लाखो लोकांसाठी आम्ही ते करूच.
       खाण उद्योग पूर्ववत सुरू होण्यास विलंब झाला तर शिवसेना खासदार खाण अवलंबितांना केंद्रीय निधीतून किमान आर्थिक आधार देण्याविषयी संसदेत ठराव मांडेल किंवा राज्य सरकारकडे पडून असलेल्या जिल्हा खाण निधीतून मदत करण्याची व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
       खाण कर्मचारी व या उद्योगाने स्वामित्व धन (रॉयल्टी) आणि इतर कर यांच्या रूपाने केंद्राच्या आणि राज्याच्या तिजोऱ्यांमधे आजवर लाखो रुपयांची भर घातलेली आहे, असे नमूद करून नाईक म्हणाल्या, गोव्याच्या विकासात खाण उद्योगाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता त्यांच्यापुढे पेचप्रसंग उभा राहिलेला असताना त्यांना मदतीचा हात देणे हे केंद्र आणि राज्य सरकारांचे कर्तव्य आहे.
        या देशात शेतकऱ्यांना विविध प्रकारे कर्जमुक्त करून जसा आधार दिला जात आहे, तसाच भारताच्या विकासात खाण कर्मचाऱ्यांनी घातलेल्या बहुमोल भरीचा विचार करून त्यांनाही आर्थिक आधार दिला गेला पाहिजे, असे मत राखी नाईक यांनी व्यक्त केले आहे.
राखी नाईक यांनी दक्षिण गोव्यात प्रचारास सुरुवात केली आहे.स्थानिक विषय हाताळले असल्याने मतदारांचा आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे,असा दावा नाईक यांनी केला आहे.