खाण अवलंबीतांच्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर पणजीत उद्या 144 कलम लागू

0
945

गोवा खबर:सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गोव्यातील खाणी बंद पडल्या नंतर बेकार झालेल्या खाण अवलंबीतांनी उद्या पणजी मध्ये महामोर्चाचे आयोजन केले आहे.बार्ज मालक संघटनेने या मोर्चाला पाठिंबा दर्शवत बार्ज मांडवी नदीत नांगरुन जलमार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.उद्या बारावीची परीक्षा असून विद्यर्थ्यांना महामोर्चाचा फटका बसू नये यासाठी सरकारने वरिष्ठ पातळीवर उपाययोजना केल्या आहेत.सकाळी 6 ते सकाळी 10.30 वाजेपर्यंत उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी पणजी बस स्थानक आणि मांडवी पुलावर 144 कलम लागू केले आहे.
उद्याच्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळ सल्लागार समितीची बैठक सायंकाळी उशिरा उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.या बैठकीत पोलिस आणि प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उद्याच्या महामोर्चाचा सामना करण्यासाठी निर्देश देण्यात आले.
बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले,आमचा मोर्चाला विरोध नाही.मोर्चामुळे सर्वसामान्य लोक,बारावीचे विद्यार्थी आणि पर्यटकांना त्रास होऊ नये याची खबरदारी मोर्चेकऱ्यांनी घ्यावी.वाहतूक व्यवस्थेला बाधा येणार नाही अशा पद्धतीने आपले मत मोर्चेकऱ्यांनी व्यक्त करावे.
नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी विद्यर्थ्यांना मोर्चा मुळे त्रास झाला तर मोर्चेकऱ्यां बद्दल असलेली सहानुभूती संपायला वेळ लागणार नाही असा इशारा दिला.
मोर्चेकऱ्यांना कॅबिनेट सल्लागार समितीचे आवाहन
#सकाळी 10.30पूर्वी पणजी मध्ये येऊ नका
#मोर्चेकऱ्यांनी पुलांवर वाहतूक कोंडी होऊ नये याची खबरदारी घ्यावी
#मोर्चेकऱ्यांनी आपली वाहने मरेशी जंक्शनकडे पार्क करून चालत शिस्तीने पणजी मध्ये यावे
#मोर्चेकऱ्यांनी आपली वाहने कांपाल मध्ये पार्क करून आझाद मैदाना ऐवजी कांपाल परेड मैदानावर आपले आंदोलन करावे
#मोर्चेकरांनी शिष्टमंडळ घेऊन 1 वाजता सचिवालयात येऊन भेटावे किंवा आम्ही 3 वाजता येऊन त्यांना आंदोलन स्थळी भेटू

मंत्री ढवळीकर यांनी पर्यटकांना देखील आवाहन केले आहे.पर्यटकांनी हॉटेल वरुन गोव्या बाहेर जायचे असेल तर सकाळी 10.30 पूर्वी विमानतळ, रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानक गाठावे
#पर्यटकांनी शक्यतो दुपारी 3 वाजेपर्यंत हॉटेल बाहेर पडू नये असे आवाहन देखील ढवळीकर यांनी केले आहे.
भाजपचे मोर्चा स्थगित करण्याचे आवाहन
खाण अवलंबीतांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या आणि परवा गोव्यात असून ते खनन अवलंबीतांच्या समस्या जाणून घेणार आहेत.आमचे प्रयत्न सुरु असल्याची दखल घेऊन मोर्चेकऱ्यांनी उद्या आयोजीत केलेला मोर्चा स्थगित करावा असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी केले आहे.
नितीन गडकरी उद्या गोव्यात
खाण अवलंबीतांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी उद्या रात्री 8 वाजता गोव्यात पोचणार आहेत.उद्या येथील एका हॉटेल मध्ये गडकरी भाजप विधी मंडळ गटाशी खाण बंदीच्या प्रश्नावर चर्चा करणार आहेत.