खाणी सुरु करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु

0
843

 

गोवा खबर:गोव्यात खाण बंदीमुळे निर्माण झालेल्या स्थितीची केंद्र सरकारला पूर्ण जाणीव आहे. गोवा सरकार, आपण स्वत: तसेच खासदार नरेंद्र सावईकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपर्कात आहेत. गोव्यातील खाणी लवकरात लवकर सुरू व्हाव्या यासाठी केंद्र सरकार आणि गोवा सरकार यांच्या दरम्यान चर्चाही सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच गोव्यातील खाणी सुरू करणार असा ठाम विश्वास आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला आहे.

गोव्यातील खाणबंदीच्या समस्येवर तोडगा काढण्यासंदर्भात पुन्हा नव्याने हालचाली सुरू झाल्या आहेत. आयुषमंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर यांच्यासह मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही स्वत: पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधला आहे.

खाणपट्टय़ातील लोक आणि खाणअवलंबित यांनी सरकारविरोधात आक्रमक धोरण स्विकारल्याने सरकार आणि भाजपसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी ही बाब अडचणीची ठरू शकते याची जाणीव झाल्याने आता गोवा सरकार आणि दोन्ही खासदार यांनी प्रयत्न चालविले आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्वत: पंतप्रधान कार्यालय व केंद्रीय नेत्यांशी दोन दिवसापूर्वी संपर्क साधला होता.

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर व भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनीही भजपच्या पेंद्रीय नेत्याशी संपर्क साधून खाण पट्टय़ातील स्थितीबाबत माहिती दिली आहे. भाजप नेते खाणबंदीवर तोडगा निघावा यासाठी गांभीर्याने प्रयत्न करीत आहेत. लोकसभेचे दोन्ही मतदारसंघ जिंकायचे असल्यास खाणबंदीवर त्वरित तोडगा काढणे आवश्यक असल्याचे गोवा सरकारने व भाजपने केंद्रीय नेत्यांना सांगितले आहे.

 

 

राज्यातील खाण व्यावसाय  लवकर सुरू होणे ही काळाची गरज आहे. खाणबंदी मुळे खाण अवलंबित अत्यंत अडचणीत आले आहेत. अनेक व्यवसायांवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे खाण अवलंबितांसह गोव्यातील लोकांचाही खाणी सुरू करण्यासाठी मोठा आग्रह आहे, असे खासदार सावईकर यांनी सांगितले. गोवा सरकार आणि राज्यातील तिन्ही खासदार खाणी सुरू व्हाव्या यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. गोव्यातील खाण व्यवसाय लवकर सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी योग्य असा तोडगा काढतील, असा विश्वासही सावईकर यांनी व्यक्त केला.